लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना विपणन, प्रक्रिया इत्यादींचे इत्थंभूत प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशविदेशातील कृषितज्ज्ञ आणि नामांकित कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘लोकमत’च्या चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.रेशीमबाग मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा-उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘यूपीएल’चे अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर व इंडस्ट्री रिलेशन्स) सागर कौशिक, ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष पी.जी.जगदीश, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक डॉ.एम.एस.लदानिया, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले प्रामुख्याने उपस्थित होते. पिकांच्या चक्राच्या व्यवस्थापनाचे ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर’, ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ व ‘ड्रोन’च्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा सल्ला मिळेल. अनेकदा पीक उत्पादन जास्त होते व भाव पडतात. बाजाराचा अंदाज शेतकऱ्यांना यावा यासाठी पिकाचे झालेले उत्पादन, देश व राज्याची क्षमता व बाजारभावांचा अंदाजदेखील व्यक्त करता येऊ शकेल. तंत्रज्ञान अंगिकारून शाश्वत शेतीकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक आहे, असे हंसराज अहिर म्हणाले.देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रातील फळांच्या विक्रीचे ‘स्टॉल्स’ लागले पाहिजेत. तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षभर उपक्रमांचे आयोजन व्हायला हवे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.दिल्ली, मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज उठवावा : गडकरीआपल्या देशातील शेतकऱ्यांची मोठी समस्या ही आहे की सरकारकडे त्यांच्या हक्कांसाठी हवा तसा आवाज उचलण्यात येत नाही. दिल्ली व मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी सक्षम लोकांची संख्या वाढायला हवी, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. संत्र्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशस्वी संस्था, शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा, असेदेखील ते म्हणाले.