आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनामतीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना थेट प्रमाणपत्र प्रदान न करता, प्रशिक्षणाचा फायदा संबंधित कृषी अधिकारी खरेच शेतकऱ्यांमध्ये जाऊन करतात की नाही, हे तपासून पाहिल्यानंतरच त्यांच्या वरिष्ठांकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावे. यावर वनामतीने गंभीर विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रमाणपत्र हाती पडावे यासाठी कृषी अधिकाऱ्यांना आता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांमध्ये काम करावे लागणार आहे.वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) ही कृषी विभागांतर्गत काम करणारी प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था राज्यातील कृषी विभागातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून आलेल्या अधिकाऱ्यांनाही ही संस्था विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असते. या संस्थेचे मुख्य काम मात्र कृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आहे. अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, त्यात त्यांचे ज्ञान अपडेट व्हावे, त्या योजना लोकांपर्यंत विशेषत: शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, असा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. केवळ कृषी विभागाचा विचार केला तर तब्बल ३४ विविध प्रकारचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिले जाते. या प्रशिक्षणात विविध अधिकाऱ्यांमध्ये संवाद होतो. त्यांनी आपापल्या ठिकाणी कोणती योजना कशी राबवली, कोणत्या अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली. एखाद्या अधिकाऱ्याने काही नावीन्यपूर्ण काम केले असेल, यावरही सांगोपांग चर्चा होऊन कृषी अधिकारी हे अपटेड होत असतात. हे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या क्षेत्रात शासनाची योजना राबवून घेण्यासाठी फायदा करवून घ्यायचा असतो. या प्रशिक्षणामागचा उद्देश अतिशय चांगला आहे. त्याचे काही परिणामही दिसून येतात. परंतु पाहिजे तसा परिणाम होताना दिसून येत नाही. कारण बहुतांश अधिकारी या प्रशिक्षणाला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. विभागाने प्रशिक्षणासाठी पाठवले म्हणून करून घ्यायचे.या प्रशिक्षणानंतर मिळालेले प्रमाणपत्र हे आपल्या सर्व्हिस बुकसाठी फायद्याचे ठरते म्हणून प्रशिक्षण घ्यावे, अशा विचारातूनही अधिकारी या प्रशिक्षणाकडे पाहत असल्याचा जाणकारांचा अनुभव आहे. त्यातून अधिकारी हे प्रशिक्षण घेऊन गेले की, ते आपल्या कामात व्यस्त होतात. परिणामी या प्रशिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होताना दिसून येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करीत वनामती कृषी विभागाशी संबंधित प्रशिक्षणातही आवश्यक बदल करण्याचा विचार करीत आहे.शेतकऱ्यांना फायदा हाच उद्देशकृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यामागे शेतकरी हा केंद्रबिंदू असतो. त्याला लाभ मिळावा हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्याने त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवयक आहे. त्यासाठी त्याला शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. त्यांना समजावून सांगाव्या लागतील. म्हणून प्रशिक्षणानंतर मिळणारे प्रमाणपत्र थेट अधिकऱ्यांना न देता ते प्रशिक्षणाचा उपयोग खरेच शेतकऱ्यांसाठी करीत आहेत का? याची चाचपणी व्हावी व नंतरच त्यांच्या विभागप्रमुखांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करावे, असा विचार सुरू आहे. हे सध्या प्राथमिक स्तरावर आहे. अॅकेडेमिक कौन्सिल व जनरल कौन्सिलमध्ये यावर चर्चा होईल. त्यांची मंजुरी मिळाल्यावर ही योजना लागू होईल.- रवींद्र ठाकरे, संचालक, वनामती
कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये जाऊन करावे लागणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:46 PM
कृषी अधिकारी खरेच शेतकऱ्यांमध्ये जाऊन करतात की नाही, हे तपासून पाहिल्यानंतरच त्यांच्या वरिष्ठांकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावे. यावर वनामतीने गंभीर विचार सुरू केला आहे.
ठळक मुद्दे‘फिल्ड’वर जाल तरच प्रमाणपत्र‘वनामती’चा पुढाकार