लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी महावितरणने १ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत राज्यात कृषी ऊर्जा पर्व आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी लाईनद्वारे दिवसा आठ तास वीज देणे, थकीत रकमेत सवलत देणे व पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल.
कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी वीज ग्राहकांचे संमेलन आयोजित केले जातील. यादरम्यान थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाईल. नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. ग्राम विकास विभाग व जिल्हा परिषद यांच्यासोबत समन्वय साधून हे संमेलने आयोजित केली जातील. याच प्रकारे महिला सशक्तीकरण संकल्पने अंतर्गत ८ मार्च रोजी महिला दिवसानिमित्त थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार केला जाईल. महिलांच्या नावावर वीज कनेक्शन देण्यास प्राधान्य दिले जाईल. महिला सरपंच, जनमित्र व कर्मचारी, अंगणवाडी सेविकांचाही सत्कार केला जाईल. या धोरणाच्या प्रचारासाठी जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजार आदी ठिकाणी होर्डींग व पोस्टर लावले जातील. गावा-गावांमध्ये प्रचार केला जाईल. सोबतच एसएमएस व सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जागृती केली जाईल. बिलासंदर्भात आलेल्या तक्रारींचा निपटाराही केला जाईल.