लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले.वर्धा जिल्ह्यातील देवळी व हिंगणघाट येथे कापूस बाजार मात्र यातून सुटला होता. वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. संपाची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना असल्याने त्यांनी आपला माल समितीत आणला नव्हता.यवतमाळ जिल्ह्यातील १७ पैकी १६ समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यात एकूण १९० पैकी १७५ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या संपातून अंग काढून घेतल्याने तेथील खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत सुरू आहे. कर्मचारीच संपावर असल्याने जिल्ह्यातील उमरखेड वगळता १६ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहे. बाजार समितीतील सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदी मालाची खरेदी-विक्री व उलाढाल थांबली आहे. मुंबईत बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा बेमुदत संप सुरू झाल्याने शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान शासनाच्याविरोधात जायचे नाही, असे स्पष्ट करीत उमरखेड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही.गोंदिया जिल्ह्यात देवरी, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, आमगाव अशा एकूण सात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. गुरूवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने या सातही बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. केवळ प्रशासकीय कामकाज सुरू होते. कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धरणे दिली. कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका काही प्रमाणात धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसला. बाजार समितीत खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने त्यांना आल्या पावलीच परत जावे लागले.भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कर्मचारी गेले आहेत. या संपामुळे बाजार समितीचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. जिल्ह्यात तुमसर, भंडारा, लाखनी आणि पवनी येथे बाजार समिती असून या संपात ४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील १३ ही बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. चंद्रपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती बाजार समितीतील शेती माल खरेदी-विक्री व उलाढाल थांबली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संप; विदर्भातील बाजार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 3:31 PM
कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले.
ठळक मुद्देमालाची खरेदी-विक्री थांबलीशेतकऱ्यांची झाली कोंडी