जलालखेडा : नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा, मोसंबीची फळगळ सुरू आहे. तसेच सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. फळगळ पाहणी करण्यासाठी कृषी विद्यापीठाची चमू व तज्ज्ञ गुरुवारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. असे असले तरी दरवर्षी फळगळती, खोडकीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. प्रत्येक वर्षी कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येते. परंतु यावर कायमची उपाययोजना अजूनपर्यंत करण्यात आली नाही. शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्यात हाती येणारे संत्रा, मोसंबीचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी बगीचे ५० ते ६० टक्के आले असून, फळगळ होत असल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणत घट होणार आहे. सोयाबीन पिकावरसुद्धा खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कपाशीवरसुद्धा बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर कायमची उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कृषितज्ज्ञांनी तालुक्यातील जोलवाडी, जामगाव, उमठा, नायगाव (ठाकरे), खापरी केणे या ठिकाणी जाऊन फळबागेची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सभापती नीलिमा रेवतकर, सहसंचालक भोसले, जिल्हा कृषी अधिकारी शेंडे, तालुका कृषी अधिकारी डॉ. योगिराज जुमडे, डॉ. दास, डॉ. हुच्चे, डॉ. मेश्राम, डॉ. पंचभाई, डॉ. गजभिये, डॉ. दवणे, डॉ. धार्मिक, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, घनश्याम ठाकरे, काटोल येथील प्रगतशील शेतकरी मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी ठाकूर, कृषी सहायक अमित वानखेडे आदी उपस्थित होते.
260821\img-20210826-wa0251.jpg
फोटो ओळी. नायगाव ठाकरे येथील प्रगतशील शेतकरी घनश्याम ठाकरे यांच्याशी चर्चा करताना कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ.