कृषी सहसंचालक कार्यालय : नलिनी भोयर यांच्या बदलीची मागणी नागपूर : भंडारा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांच्याविरूद्ध कृषी विभागातील कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलन पुकारले आहे. यात शनिवारी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी सिव्हिल लाईन्स येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी कृषी उपसंचालक अजय राऊत आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी डॉ. नलिनी भोयर यांची तडकाफडकी बदली करा, अशी मागणी केली. मात्र त्यावर गजानन पाटील यांनी डॉ. भोयर यांच्या बदलीचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून हात वर केले. त्यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांच्या मते, डॉ. नलिनी भोयर या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड मानसिक छळ करीत आहेत. शिवाय त्या प्रशासकीय कामकाज करीत असताना आपल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सतत असंसदीय भाषेचा वापर करतात. एवढेच नव्हे, तर वेतनवाढ थांबविणे, बिनपगारी करणे, पदोपदी अपमानित करणे व वार्षिक वेतनवाढ थांबविण्याच्या धमक्या देतात. डॉ. भोयर यांच्या या छळाला कंटाळून अनेक कर्मचारी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचले असल्याचाही निवेदनात उल्लेख केला आहे.कृषी विभागातील या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून हे आंदोलन पुकारले आहे. यामुळे भंडारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. शनिवारी आंदोलनकर्त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा चिघळण्याचे संकेत मिळत आहे. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात म्हणजे, २ ते ५ मे २०१६ दरम्यान कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच ६ व ७ मे रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजतापर्यंत लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार असून, १० मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र आर. पांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी डॉ. नलिनी भोयर यांनी जिल्ह्यातील विविध योजनांतर्गंत निविष्ठा, औषधे व अवजारे इत्यादींचा खरेदी व्यवहार करताना उप विभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांना विश्वसात न घेता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयस्तरावरून थेट खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप ेकेला आहे. तसेच क्षेत्रीयस्तरावर योजना राबवितांना आवश्यक आकस्मिक निधी व इतर आवश्यक निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचीही आंदोलनकर्त्यांनी तक्रार केली आहे.
कृषी कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन
By admin | Published: May 01, 2016 2:54 AM