जीवन रामावत नागपूरकृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेसाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्य शासनाने कृषी विभागातील अस्थाई पदभरतीसाठी चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेची निवड केली आहे. त्यानुसार या संस्थेने मागील आॅगस्ट महिन्यात विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या सहा जिल्ह्याकरिता एकूण २८२ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करू न अर्ज मागविले होते. यात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक - ६३ (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक १८९ (एटीएम), संगणक आज्ञावली - ६ व संगणक प्रचालक म्हणून २४ पदांचा समावेश होता. मात्र या जाहिरातीत संस्थेने आपल्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता, शिवाय पत्ताही दिलेला नाही. केवळ ई-मेल व संपर्क क्रमांक देऊन, त्यावर अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार विदर्भातील शेकडो बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ््या पदांसाठी अर्ज केले.यानंतर संबंधित संस्थेने सर्व उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठवून एक हजार रुपये रोख किंवा डीडीसह मुलाखतीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार २ ते ५ सप्टेंबरदरम्यान धंतोली परिसरातील हॉटेल ग्रीन सिटीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यात सुमारे ३५० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मात्र त्या मुलाखतीला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असताना अजूनपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांची अंतिम निवड यादी कुठे अडली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, भरती प्रक्रियेत सुरू असलेल्या घोळाचा भांडाफोड झाला. माहिती सूत्रानुसार संबंधित संस्थेने विभागात मंजूर असलेल्या सर्वच २८२ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. परंतु वास्तविक विभागात तेवढी पदेच रिक्त नाहीत. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्वीच्या ९४ लोकांना कमी करू न त्यांच्या जागी नव्याने पदभरती करण्यास स्थगिती दिली आहे. असे असताना संबंधित संस्थेने २८२ पदांसाठी मुलाखती घेऊन बेरोजगार तरुणांची सर्रास दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. यातच संबंधित संस्थेने ‘आत्मा’ यंत्रणेला कुठेही विश्वासात न घेता ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘आत्मा’ यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत, त्याची विभागीय कृषी सहसंचालकांकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे. यामुळेच कृषी विभागाने अंतिम निवड यादी जाहीर न करता, संस्थेच्या भरती प्रक्रियेला ‘बे्रक’लावला आहे. शिवाय संस्थेकडून आलेल्या यादीची नव्याने छाननी करू न निवड प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जात आहे. मात्र या संपूर्ण घोळामुळे मुलाखती दिलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे काही उमेदवार संपूर्ण प्रक्रिया रद्द करू न, नव्याने भरती करण्याची मागणी करीत आहे. यासंबंधी कृषी विभागाची बाजू ऐकून घेण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांच्याशी दूरध्वनीवरू न संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
कृषी विभागाच्या ‘बीटीएम’वर बडगा!
By admin | Published: September 26, 2015 2:54 AM