लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवंगत पांडुरंगजी फुंडकर यांच्या नंतर राज्यात जवळपास दोन-अडीच वर्ष स्वतंत्र कृषी मंत्री नव्हते. आता विदर्भातील भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपद दिले आहे. ते स्वत: संत्रा व मोसंबीचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या सर्व समस्या माहिती आहते. यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.मागील साडेचार-पाच वर्षापासून संत्रा व मोसंबी उत्पादक मेटाकुटीस आला आहे. नोटाबंदीच्या काळात तर उत्पादन होऊन संत्र्याला मातीमोल भाव मिळाला होता. वाहतुकीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी संत्रा व मोसंबी रस्त्यावर फेकली होती. दुष्काळामुळे यावर्षी संत्रा व मोसंबीचे उत्पादनच झाले नाही. राज्य सरकारच्या वतीने बहुवार्षिक पिकांना मदत जाहीर करण्यात आली. कृषी मंत्री बोंडे यांच्या वरुड व मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानाची मदत मिळाली. परंतु या मदतीपासून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. आता तर पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. परंतु याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत.२०१२ मध्ये मराठवाड्यातील जालना जिल्हात दुष्काळ पडला असता तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी संत्राबागा वाचविण्यासाठी प्रति हेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत ६० हजार रुपयाची मदत दिली होती. अशीच मदत भाजपा सरकार करेल अशी अपेक्षा होती. परंतु याकडे सुध्दा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांचा मतदारसंघ संत्रा व मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. बोंडे यांनीच यापूर्वी संत्रा, मोसंबीसाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता ते न्याय देतील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
कृषीमंत्र्यांनी मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:56 AM
संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देअनिल देशमुख यांची मागणी