लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आष्टी येथील तालुका कृषी अधिकारीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याने कार्यालयातीलच एका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संवाद साधल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, या गैरअर्जदार अधिकाऱ्याने केलेल्या प्रकाराची चौकशी महिला तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. (molestation, sexual message from officer to female employee )
आष्टी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील या पीडित महिला कर्मचाऱ्याच्या माेकळ्या स्वभावाचा फायदा घेत प्रभारी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेरी यांनी तिच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून मानसिक त्रास दिला. पीडितेने याची रीतसर लेखी तक्रार कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी केली. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आर्वी येथील महिला कृषी अधिकारी सुप्रिया वायवल यांच्याकडे साेपविण्यात आली. लवकरच त्या आपला चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहेत.
पोलिसांकडे प्रकरण जाऊ न देण्यासाठी दबाव
पीडित महिलेने या प्रकाराची माहिती काहींना सांगितली. पण त्यावेळी बड्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ न देण्यासाठी पीडितेवरच दबाव आणल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आपण तक्रारीच्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाली असून लवकरच आपण चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करू.
- सुप्रिया वायवल, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.