लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंपनीचे व्हाऊचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने अवघ्या ३४ दिवसांत सव्वासात लाखांचे डिझेल घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. ही बनवाबवनी उघड झाल्यानंतर कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.एमआयडीसीतील झोन चौकात मुरली अॅग्रो कंपनी आहे. येथे आरोपी दुबे वाहनचालक म्हणून कामावर होता. पेट्रोल पंपाच्या संचालकांसोबत असलेल्या करारानुसार, कंपनीच्या वाहनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रोख रकमेऐवजी व्हाऊचर द्यावे लागत होते. ते ध्यानात आल्यामुळे दुबे याने कंपनीचे एक व्हाऊचर बुक चोरले. त्याआधारे त्याने १ सप्टेंबर २०१९ ते ४ ऑक्टोबर २०१९ याकालावधीत तब्बल ६,४०० लिटर डिझेल हिंगणा नाक्यावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरून भरून घेतले. तो रोज २०० ते ४०० लिटर इंधन भरायचा. दुबे आणि साथीदारांची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कंपनी प्रशासनाने त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सात लाख १४ हजारांचे इंधन उचलणारा दुबे विचारपूस करताच गायब झाल्याने कंपनीतर्फे राहुल नामदेव बोरकर (वय २८) यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती हवालदार विजय नेमाडे यांनी बुधवारी आरोपी दुबेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.आरोपी उत्तर प्रदेशात पळालाआरोपी दुबे मूळचा गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याची बनवानबवी ७ ऑक्टोबरला कंपनीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्याला यासंबंधाने त्यादिवशी जुजबी विचारपूस करण्यात आली. आपले बिंग फुटणार याची कल्पना येताच दुबेने आपला पगार उचलला आणि दुसऱ्या दिवशीपासून कामावर येणे बंद केले. तो त्याच्या मूळगावी, उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
अॅग्रो कंपनीच्या वाहन चालकाची बनवाबनवी , सव्वासात लाखांचे घेतले डिझेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 8:20 PM
कंपनीचे व्हाऊचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने अवघ्या ३४ दिवसांत सव्वासात लाखांचे डिझेल घेतल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.
ठळक मुद्देनागपूर एमआयडीसीत गुन्हा दाखल