नागपूर: 'जिथे पिकते तिथे विकत नसते. अगदी हीच अवस्था भिवापूर तालुक्यातील जगविख्यात हळद आणि मिरचीच्या संदर्भात आहे. समजा याच तालुक्यात पिकणार्या हळद आणि मिरचीवर प्रक्रिया करणारी अॅग्रो इंडस्ट्री उदयास आली तर हा भाग सुजलाम् सुफलाम् होईल', अशी भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी मांडली आहे.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर हा भाग वायगाव हळद आणि मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मिरचीचा स्वाद मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. त्याकरिता ते भिवापुरी मिरचीचेच तिखट द्या, अशी मागणी दुकानदारांकडे करीत असतात. हा भिवापुरी मिरचीचा तो ठसका पाहता, अॅग्रो इंडस्ट्री उभी राहणे काळाची गरज बनली आहे. त्यानुसार भिवापुरात हा उद्योग स्थापन व्हावा याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रकल्प अहवालापासून तो प्रत्यक्ष काम सुरू होण्यापर्यंत जे काही लागते तीही मदत तज्ज्ञांमार्फत केली जावी.
सन 1960 पासून भिवापूर मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लाल रंगाच्या मिरचीचा केवळ तिखटच नाही तर लाल रंगाची लिपस्टिक, नेल पॉलिश, क्रिम्समध्येही तिचा उपयोग केला जातो. भिवापूरी मिरचीत व्हिटामिन ए, बी, बी 6 आणि सी तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम व मॉलिबेडनम पदार्थ अधिक प्रमाणात आढळून येतात. यामुळे ही मिरची केवळ जिभेवरच अधिराज्य करते असे नसून, ती शरीराला सुदृढ ठेवण्याचेही कार्य करते. अशी ही प्राचीन वारसा लाभलेली मिरची भिवापूरची शान आहे. शिवाय वायगाव हळदीचेही महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. या स्थितीत भिवापुरात अॅग्रो इंडस्ट्री उभी राहणे काळाची गरज आहे.
आज गावागावात बचत गटांची स्थापना झाली आहे. त्या गटातील महिलांना कुटीर उद्योग म्हणून याकडे वळवले तर फार मोठी उलाढाल यामाध्यमाने होईल, अन् हजारो लोकांना रोजगार मिळेल असेही अरविंद गजभिये यांनी स्पष्ट केले.