लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीकडे आकर्षित करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात बांबूवर आधारीत उत्पादनाचा स्टॉल महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून लावण्यात आला आहे. बोर्डाचे संचालक टीएसके रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बांबूच्या उत्पादनाची माहिती देण्यात येत आहे. स्टॉलवर बांबूपासून तयार करण्यात आलेले बायो-आॅईल, बायो इथेनॉल व चारकोल ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा अनेकदा आपल्या भाषणातून बांबूपासून आॅईल तयार करण्यासाठी संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. बांबूपासून तयार करण्यात आलेले आॅईल परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. भविष्यात वाहनांचे इंधन म्हणून सुद्धा याचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर बांबू व रेशीम व कॉटनचे मिश्रण तयार करून कापड व शर्ट तयार करण्यात आले आहे. स्टॉलवर बांबूपासून बनविण्यात आलेले फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, आकर्षक कलाकृतीसुद्धा आहे. सोबतच देशभरात उपलब्ध असलेल्या बांबूच्या १२०० प्रजातीची माहिती या स्टॉलवर उपलब्ध आहे.बांबूचे पडदेबांबूपासून तयार केलेल्या पडद्यांचा स्टॉल सुद्धा येथे आहे. रमेश जीवने हे गेल्या २८ वर्षापासून बांबूचे पडदे तयार करीत आहे. सुरूवातीला अगदी छोट्या स्वरुपात असलेल्या त्यांच्या व्यवसायाचे आता कारखान्यात रुपांतर झाले आहे. त्यांच्या उत्पादनाला देशभरातून मागणी आहे.