लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : जिल्हा परिषदेच्या शेष फंड याेजनेंतर्गत मंगळवारी (दि.१५) वेलतूर येथे खरीप हंगाम प्रचार-प्रसिद्धी अभियानाला प्रारंभ झाला. याप्रसंगी विविध कृषी याेजनांची माहिती देताना कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना माैलिक मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य व मान्यवरांच्या हस्ते खरीप हंगाम प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी शेतकऱ्यांनी विविध उपक्रम राबवून प्रगतिशील शेतकरी बनावे, असे आवाहन तापेश्वर वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष सुनील किंदर्ले, पं. स. सदस्य पंकज मेश्राम, तळेकर, वेलतूर येथील सरपंच सविता किंदर्ले, उपसरपंच प्रशांत तितरमारे, ग्रा. पं. सदस्य पिंकी रोडगे, महादेव घुघुसकार, प्रगतिशील शेतकरी लुनेश्वर बाळबुद्धे, तुकाराम शिवणकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषितज्ज्ञ शेंडे, पाटील, सहायक एस. एस.मेश्राम, ग्रामविकास अधिकारी हर्षवर्धन तागडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी पी. के. नागरगाेजे यांनी केले तर आभार अमोल महल्ले यांनी मानले.
....
मंडळ कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करा
कुही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मांढळ येथे कार्यान्वित आहे. परंतु विविध अनुदानाच्या याेजना वेलतूर गावाला वगळून इतर गावात कृषी प्रकल्प राबविले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्याकडे केली. मंडळ कृषी अधिकारी वेलतूर येथे भेटी देत नाही. तसेच कृषी सहायकामार्फत आपल्या मर्जीतील गावानाच अनुदानित बियाणे, रासायनिक खते आदी कृषी प्रकल्प राबविण्यात येत असल्याने मंडळ कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.