लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मेवात या गावातील दोन डझनपेक्षा जास्त जण एटीएम हॅक करून आतमधील रोकड उडविण्यात सराईत आहेत. यांच्यातील एका टोळीचा सूत्रधार इकबाल खान याला परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या पथकाने ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याच्या चाैकशीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
१४ ते १६ जूनच्या दरम्यान नागपुरातील चार ठिकाणचे एटीएम हॅक करून ६.७५ लाख रुपये काढून घेण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास केला. या प्रकरणात पलव, हरियाणा येथील एका व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथक तिकडे पाठविण्यात आले आणि इकबालखान, अनिस खान तसेच मोहम्मद तालिब यांना अटक करून नागपुरात आणण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता चक्रावून सोडणारी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानुसार, मेवात या लहानशा गावात ५० पेक्षा जास्त तरुणांनी एटीएम हॅक करून रक्कम उडविण्याचे तंत्र अवगत केल्याचे समजते. अनेक दिवसांपासून त्यांनी हा गोरखधंदा सुरू केला असून, देशातील विविध शहरातून त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये उडविल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.
इकबालच्या कथनानुसार, तो मोबाईल टॉवर उभारणीचे काम करीत असताना अवघ्या काही सेकंदात एटीएममधल्या व्यवहाराची नोंद न होऊ देता कॅश डिपॉजिट मशीन (सीडीएम)मधून रक्कम काढून घेण्याचे तंत्र शिकला. या तंत्राचा वापर करून त्याने हरियाणा, राजस्थानमध्ये प्रारंभी रक्कम उडविण्याचे प्रयोग केले. त्यात यश आल्यानंतर त्याने आपली टोळी बनवून देशयात्राच सुरू केली.
अनेक राज्यात हैदोस
इकबाल आणि त्याच्या टोळीने अनेक राज्यात अक्षरश हैदोस घातला आहे. तो आणि त्याच्या टोळीचे सदस्य आधी कोणत्या ठिकाणी सीडीएम आहे, ते बघतात. त्यानंतर तेथून ते रोकड पळवून पुढे निघतात.
इकबाल आणि त्याच्या टोळीने महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, सोलापूरसह अनेक ठिकाणी लाखोंचे हात मारले तर, नाशिक आणि मुंबईत प्रयत्न केले. शिवाय भुवनेश्वर, कटक, मिदनापूर, कोलकाता, कर्नाटक, बिदर, आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणम आदी ठिकाणाहूनही या टोळीने लाखोंची रोकडे लंपास केली आहे.
---