नागपूर : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहर भाजपच्या जम्बो कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी ही घोषणा केली. या कार्यकारिणीत अनुभवी व तरुणांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या काही जणांना सध्या कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही, तर पाच मंडळांचे अध्यक्ष बदलण्यात आले आहे. दरम्यान, पक्षातर्फे एकही आघाडी किंवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली नसल्याने इच्छुकांची नजर तिकडे लागली आहे.
भाजपच्या या जंबो कार्यकारिणीत राम अंबुलकर, विलास त्रिवेदी, अश्विनी जिचकार, संदीप गवई, विष्णू चंगडे यांना महामंत्री करण्यात आले आहेत. भाजपने पुन्हा विनोद कान्हेरे यांना पश्चिम नागपूरचे मंडळ अध्यक्ष केले आहे. मात्र इतर मंडळ अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. सेतराम सेलोकर (पूर्व नागपूर), श्रीकांत आगलावे (मध्य नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर), विजय असोले (दक्षिण नागपूर) आणि गणेश कानतोडे (उत्तर नागपूर) यांना मंडळ अध्यक्ष करण्यात आले आहे.
संजय अवचट, किशन गावंडे, विनायक डेहनकर, शिवनाथ पांडे आणि रमेश भंडारी यांना संपर्कप्रमुख करण्यात आले आहेत. राजेश बागडी यांची पुन्हा कोषाध्यक्ष तर देवेंद्र दस्तुरे यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यालय प्रभारी भोजराज डुंबे आणि चंदन गोस्वामी यांना मीडिया प्रभारी यांना करण्यात आले आहे. यासोबतच १६ उपाध्यक्ष आणि २१ सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
गडकरी, फडणवीस, बावनकुळेंसह मुन्ना यादव विशेष निमंत्रित
भाजपने यावेळी विशेष निमंत्रितांच्या यादीत ५४ जणांचा समावेश केला आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय आजी-माजी खासदार, आमदार, माजी आमदारांनाही यात स्थान मिळाले आहे. वादांमुळे चर्चेत असलेल्या मुन्ना यादवलाही या यादीत स्थान देण्यात आले आहे.
आघाडी-मोर्चांच्या घोषणेची प्रतीक्षा
यंदाच्या कार्यकारिणीत स्थान मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र भाजपने काही अकार्यक्षम लोकांना डच्चू दिला आहे, तर अनेकांचा विविध कारणांमुळे समावेश होऊ शकला नाही. मात्र त्यातील काही जणांना आता पक्षाच्या विविध आघाडी किंवा मोर्चांची जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पक्षातर्फे अद्याप कुठलीही आघाडी किंवा मोर्चाची घोषणा करण्यात आलेली नाही.