लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विदर्भासह मध्य भारतातील गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आणखी ५० एकर जागा मिळाली तर येथे अतिविशेष उपचार शक्य होतील. तेव्हा राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी प्रतिपादन केली आहे.
‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी दिल्लीत आरोग्य सचिवांची भेट घेतली असता त्यांनी एम्सच्या दर्जावृद्धीसाठी सहकार्याचा शब्द दिला. सध्या दीडशे एकरावर वसलेले एम्स २०१९ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाले असून, जवळपास १८ विविध विभाग आणि १२ सुपर स्पेशालिटी विभागांमधून रुग्णसेवा दिली जाते. सुरुवातीची २०० ते ३०० ओपीडी दिवसागणिक वाढून आता तीन हजारांवर गेली आहे. अद्ययावत उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ घातल्याने ‘एम्स’मध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडत आहे. शिवाय, अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणखी ५० एकर जागेची गरज आहे. एम्सच्या तत्कालीन संचालक डॉ. विभा दत्ता यांनी पाठविलेला जागेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.
याविषयी अपूर्व चंद्रा म्हणाले की, जागा ही मुख्य अडचण आहे. नव्या विभागाला मंजुरी केंद्र सरकार देते आणि शिक्षकांची नियुक्ती राज्य सरकार करते. राज्य सरकारने जागा दिली की लगेच नव्या विभागांना मान्यता दिली जाईल. ‘एम्स’मधील ‘जन औषधी मेडिकल स्टोअर’ मधून कॅन्सर, हृदयाशी संबंधित महागडी औषधे माफक दरात मिळत असून, याचा फायदा रुग्णांना होत असल्याचेही अपूर्व चंद्रा म्हणाले.
‘एम्स’ने रिक्त जागा भराव्यात
‘एम्स’च्या रिक्त जागा भरण्याचे पूर्ण अधिकार ‘एम्स’ला आहेत. यावर डॉ. जोशी म्हणाले, रिक्त जागेला घेऊन आम्ही काही जाहिराती दिल्या आहेत. परंतु, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट पद अद्यापही रिक्त आहेत.
गडकरी, फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा
नागपूरचे एम्स हे मध्य भारतातील सर्वांत मोठे विशेषोपचार रुग्णालय असून, त्याच्या वाढीव जागेची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. एम्समधील स्पेशालिस्ट डॉक्टर्स व परिचारिकांच्या रिक्त जागांचा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे, असे डॉ. विजय दर्डा या भेटीनंतर म्हणाले.
‘ट्रॉमा केअर सेंटर’ व अद्ययावत लायब्ररीचे नियोजन
प्रस्तावित ५० एकर जागेचे दहा वर्षाचे नियोजन तयार असून, सुपर स्पेशालिटी ब्लॉक उभारले जातील. यात अपघातात गंभीर जखमी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आकस्मिक विभागासह ‘ट्रॉमा केअर सेंटर’ असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ई-लायब्ररीची सोय असेल.
नर्सेसच्या ५० टक्के पद रिक्त
एम्समध्ये ८२० बेडच्या तुलनेत १००० नर्सेसच्या पदांना मंजुरी प्राप्त आहे. परंतु, ५२० जागा भरण्यात आल्या आहेत. एकूण ५० टक्के पद रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
‘एम्स’ला वाढीव ५० एकर जागेसाठी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडचे (एमएडीसी) अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी तसेच आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या सहसचिव अंकिता मिश्रा बुंदेला यांनाही पत्र दिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांचीही भेट घेऊन त्यांना प्रस्ताव दिला असून, त्यांनी तो राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पाठविला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्तावित जागेच्या वापराचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. -डॉ. पी. पी. जोशी, संचालक, एम्स, नागपूर