लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुप्रतीक्षेत व राज्य शासनाचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक म्हणून मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी पदभार सांभाळताच केवळ तीन महिन्यांमध्ये विकास कामांना गती आली आहे. नववर्षात मिहानमधील ‘एम्स’च्या जागेवर बाह्यरुग्ण विभागातून (ओपीडी) रुग्णसेवा सुरू करण्याचा व त्याच ठिकाणी एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.मिहानमधील २०० एकरमध्ये ‘एम्स’ उभारले जात आहे. मात्र बांधकाम पूर्ण व्हायला सुमारे चार वर्षांचा कार्यकाळ लागणार आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सप्टेंबर महिन्यापासून ‘एम्स’चा शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. एमबीबीएसच्या ५० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.सुरुवातीला संचालकांची नेमणूक झाली नसल्याने ‘एम्स’चे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार बक्षी हे काम पाहत होते. परंतु आॅक्टोबरमध्ये डॉ. दत्ता यांची संचालकपदी नेमणूक होताच त्यांनी ‘एम्स’च्या बांधकामाला प्राधान्य दिले आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. दत्ता म्हणाल्या, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व शासनाच्या मदतीमुळेच ‘एम्स’चे वर्ग व मिहानमधील इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकली आहे.येत्या काही महिन्यात म्हणजे नववर्षात ‘एम्स’च्या स्वत:च्या इमारतीत ‘ओपीडी’ सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तूर्तास या ओपीडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ओपीडीमधून रुग्ण तपासणी सुरू होण्याची शक्यता आहे.या विभागात साधारण १५-२० खाटांची सोयही असणार आहे. परंतु रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रुग्णांना भरती करून घेतले जाणार नाही. गंभीर आजाराच्या रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जाईल. यासाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल.
वसतिगृहाच्या बांधकामाला गती देणारडॉ. दत्ता म्हणाल्या, मिहानमधील एम्सच्या वसतिगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. वसतिगृहाचे बांधकाम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोबतच एका क्वॉर्टरचे काम पूर्णत्वास आले आहे. या दोन्ही इमारतीचे हस्तांतरण होताच पुढील सत्रातील ‘एमबीबीएस’चे वर्ग या इमारतीमधून चालविण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे सर्व बांधकामावर अवलंबून आहे. एकदा त्या ठिकाणी गेलो तर इतर उर्वरित कामे आणखी वेगाने पूर्ण करता येईल, असेही त्या म्हणाल्या.
पुढील सत्रातही एमबीबीएसच्या ५० जागाएम्सची स्वत:ची इमारत पूर्ण होण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे पुढील वर्षीही एमबीबीएसच्या ५० जागांवरच प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.