लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’चे (एम्स) एमबीबीएसचे ५० विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, तर पुढील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे २५ शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला घेऊन आडवी आलेली आचारसंहिता शिथिल होताच पदभरतीला सुरुवात झाल्याची माहिती आहे.नागपूर ‘एम्स’साठी ‘अॅनाटॉमी’, ‘फिजिओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘कम्युनिटी मेडिसीन’, ‘पॅथालॉजी’, ‘मायक्रोबॉयलॉजी’, ‘फार्मेकालॉजी’ व ‘फॉरेन्सिक’ विद्याशाखेसाठी आठ प्राध्यापक, चार अतिरिक्त प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक, १६ सहायक प्राध्यापक, १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर तर आठ ट्युटर्स असे मिळून ५२ पदे निर्माण करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ३९ पदे भरण्यात आली. उर्वरित १३ व वाढीव पदे अशी मिळून सुमारे २५ शिक्षकांची पदे भरण्याच्या कार्याला गेल्या काही महिन्यापासून ‘एम्स’ने गती दिली होती. सूत्रानुसार, एम्स एमबीबीएसच्या दुसºया वर्षासाठी व नव्या सत्रातील १०० विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची तातडीने पद भरती करणे आवश्यक होते. परंतु आचारसंहिता आडवी आली. यासाठी एम्सच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांच्या मंजुरीनंतर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु नावाच्या घोषणेला घेऊन दिल्ली येथे नागपूर ‘एम्स’चे अध्यक्ष डॉ. पी. के. दवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे २३ मेनंतर निवड झालेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.