नागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) राष्ट्राला समर्पित केल्यामुळे देशभरातील आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होईल. ‘एम्स’चा लाभ विदर्भातील लोकांना होणार आहे. विशेषत: गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाटच्या आसपासच्या आदिवासी भागांसाठी ही संस्था वरदान ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
‘एम्स’ नागपूरचे औपचारिक उद्घाटन रविवारी झाले. त्याप्रसंगी ते उद्घाटन म्हणून बोलत होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ‘एम्स’चा कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता उपस्थित होत्या.
- ‘माइलस्टोन एक्झिबिशन गॅलरी’तून ‘एम्स’ची कामगिरी
‘एम्स’ची ‘ओपीडी’ व ‘आयपीडी’ला जोडणाऱ्या सभागृहात ‘माइलस्टोन एक्झिबिशन गॅलरी’चे अवलकोन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. यात ‘एम्स’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘एम्स’ मॉडेलचीही पाहणी केली.
- ११० कोटींचे असणार ‘वन हेल्थ सेंटर’
‘वन हेल्थ संस्थे’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. देशभरातील 'एक आरोग्य' दृष्टिकोनातून संशोधन आणि क्षमता वाढवण्यासाठी ही संस्था काम करेल, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. या संस्थेत प्राणीजन्य आजार पसरवणाऱ्या आजाराचे संशोधन, निदान व उपचारात्मक कार्यासाठी ११० कोटी खर्च करून ही संस्था उभारली जाणार आहे.
- हिमोग्लोबिनोपॅथीच्या क्षेत्रात होणार संशोधन
चंद्रपूर येथील ‘आयसीएमआर’च्या ‘हिमोग्लोबिनोपॅथी’ केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे सिकलसेल, थॅलेसेमियासह रक्ताच्या आजारावरील संशोधन हे मानव संसाधन विकासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.