नागपूर : शारजाहहून बांगलादेशच्या चटगांव येथे जाणारे एअर अरेबियाचे विमान तांत्रिक कारणाने आपातस्थितीत रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानात १२९ प्रवासी होते.
एअर अरेबियाचे विमान नियमित उड्डाणांतर्गत शारजाहहून चटगांवला जात होते. विमान आकाशातून जात असताना वैमानिकाला विमानाच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याचे कळले. वैमानिकाने नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर विमानाला सायंकाळी ५.१५ वाजता डायव्हर्ट करून आपातस्थितीत उतरविण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत थांबविण्यात आले. दुरुस्तीसाठी कंपनीच्या तंत्रज्ञाला बोलविण्यात आले आहे. या दरम्यान विमान कंपनीतर्फे प्रवाशांसाठी नाश्ताची व्यवस्था करण्यात आली. विमानाच्या दुरुस्तीला वेळ लागल्यास प्रवाशांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.