नागपूर : गो फर्स्ट विमान कंपनीची उड्डाणे देशभरात ३ मेपासून अचानक बंद करण्यात आली आहेत. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्याचा फायदा घेत नागपुरात विमानाचे संचालन करणाऱ्या इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्या तिकिटांच्या संख्येनुसार दरदिवशी दरवाढ करीत आहेत. त्याचा फटका सामान्य प्रवाशाला बसत असून त्यांना नागपूर-मुंबईच्या ३ हजाराच्या तिकिटासाठी ८ ते ९ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अर्थात नागपूरात विमान प्रवासाचे दर आटोक्याबाहेर गेले आहेत.
कंपन्या वाढवितात तिकिटाच्या संख्येनुसार दर नागपुरातून इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, लखनौ, हैदराबाद, रायपूर या मार्गावर रवाना होतात. यात एक वा दोन महिन्यांपासून बुकिंग केलेल्या प्रवाशांना कमी दरात अर्थात २ ते २५०० रुपयांत तिकिट मिळते. त्यानंतर ९ च्या स्लॉटनुसार पीएनआरप्रमाणे तिकिटांचे दर असतात. विमानाची अर्धी तिकिटे बुक होईपर्यंत कंपन्या फारशी दरवाढ करीत नाहीत. त्यानंतरच्या तिकिटांना जास्त पैसे मोजावे लागतात. ही दरवाढ ५ ते ९ हजार आणि अखेरच्या टप्प्यात १० ते १२ हजारांपर्यंत असते.
तिकिट दरांवर नियंत्रण कोण ठेवणार?
विमानाच्या सध्याच्या तिकिट दरांना ह्यडायनामिक फेअरह्ण म्हटले जाते. अर्थात तिकिटांच्या संख्येनुसार होणाऱ्या दरवाढीनुसार नागरी विमान महासंचालनालयाचे (डीजीसीए) नियंत्रण नाही. ह्यडायनामिक फेअरह्ण हे तिकिट बुकिंग संख्या आणि सिझनवर अवलंबून असते. केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ६ जून रोजी एअरलाइन अॅडव्हायझरी ग्रुपची बैठक घेतली होती. यावर वाढत्या तिकिट दरावर चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी विमान कंपन्यांना तिकिटांचे दर वाढवू नयेत, असे केवळ आवाहन केले. पण निर्देश दिले नाहीत. त्यामुळे वाढत्या तिकिट दरांवर नियंत्रण कोण ठेवणार? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपन्या आकारत असलेल्या मनमानी तिकिट दरांवर नागरी उड्डयण मंत्रालय नियंत्रण ठेवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.
कंपन्यांच्या ऑफरचा होतो फायदा
धनलक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक कार्तिक शेंडे म्हणाले, विमान कंपन्यांसाठी दिवाळी ते ख्रिसमस, एप्रिल ते जून हे महिने पीक पिरेड, जुलै ते ऑगस्ट मीड सिझनह समजले जातात. पीक पिरेडहमध्ये कंपन्या भरमसाठ शुल्क आकारात. तर अन्य महिन्यात कंपन्या कमी दराच्या ऑफर आणतात. नागपुरात दोनच विमान कंपन्या असल्यामुळे दरात स्पर्धा नाही. कमी दराच्या ट्रू जेट, स्पाईस जेट, एअर आशिया आणि गो-फर्स्ट कंपन्यांची विमान सेवा नागपुरातून सुरू झाल्यास कंपन्यांमध्ये स्पर्धा येईल आणि वाढीव तिकिट दरांवर नक्कीच नियंत्रण येईल, असे कार्तिक शेंडे म्हणाले.