लॅन्डिंगदरम्यान घटना : १२ विमाने पोहोचलीनागपूर : भारतीय वायुसेनेचे ‘सूर्यकिरण’ या लढाऊ विमानाचा टायर मंगळवारी दुपारी लॅन्डिंगदरम्यान फुटला. या घटनेत पायलट आणि अन्य काहीही नुकसान झालेले नाही. पण इंडिगोचे नागपूर ते दिल्ली आणि नागपूर ते पुणे या दुपारच्या विमानांनी अर्धा तास उशिराने उड्डाण भरले. यामुळे प्रवाशांना काहीवेळ असुविधांचा सामना करावा लागला. वायुसेनेची १२ विमाने सोमवार रात्रीपासूनच ये-जा करीत आहेत. ही विमाने नागपूर विमानतळावर उतरली होती. मंगळवारी दुपारी उड्डाण भरल्यानंतर लॅन्डिंगदरम्यान एका विमानाचा टायर धावपट्टीवर फुटला. धावपट्टीवर टायर फुटल्यामुळे हे विमान एका वाहनाने ओढून एअरफोर्स स्टेशनमध्ये आणावे लागले. विमानाच्या देखभालीमध्ये त्रुटी अथवा भारी लॅन्डिंगमुळे टायर फुटला असावा, अशी शक्यता आहे. या संदर्भात डिफेन्स विंगचे पीआरओ गंगाखेडकर यांनी या घटनेची माहिती नसल्यामुळे या संदर्भात काहीही बोलता येणार नाही, असे स्पष्ट केले. ही घटना धावपट्टीच्या स्थितीमुळे घडली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. पण एक वर्षापूर्वीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीचे रिकार्पेटिंग केले आहे. धावपट्टीवर कोणतेही विमान अथवा पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांचा छोटा भाग वा उपकरण पडल्याची शंका आहे. यापूर्वी विमानतळावर राष्ट्रपतीच्या विमानसमोर डुक्कर आल्याची घटना घडली आहे. आता वायुसेनेच्या विमानांना या संकटाचा सामना करावा लागला. मिहान इंडिया लिमिटेडने धावपट्टीवर प्राणी येण्याच्या शक्यतेचा इन्कार केला. (प्रतिनिधी)घटनेची माहिती नाहीहे विमान कुठून येत होते वा कुठे जात होते, याची काहीही माहिती नाही. पण दुपारी एका विमानाचा टायर फुटला, ही बाब खरी आहे. ही एकूण १२ विमाने आहेत. विमानाची देखभाल व दुरुस्ती आणि ही घटना कशी घडली, या सर्व बाबींची माहिती वायुसेनेचे अधिकारी देऊ शकतील.अवधेश प्रसाद, वरिष्ठ विमानतळ संचालक,मिहान इंडिया लिमिटेड.
वायुसेनेच्या विमानाचा टायर फुटला
By admin | Published: October 28, 2015 3:08 AM