लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. सायंकाळी मुंबईहून नागपुरात पोहोचणारे एआय ६२९ विमान निर्धारित रात्री ८.४५ या वेळेवर पोहोचले नाही. हे विमान नागपुरातून मुंबईला रात्री ९.२५ वाजता रवाना होते. वृत्त लिहिपर्यंत हे विमान रात्री जवळपास ११.३० ला नागपुरात पोहोचणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, विमान मुंबईपूर्वी उदयपूर येथून विलंबाने रवाना झाले. यामुळे नागपुरात पोहोचण्यास उशीर होणार आहे.
विमानतळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजपासून
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) कर्मचारी संघटनेच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील काही विमानतळाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करताना २५ ते २७ सप्टेंबरपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते यांनी दिली. यापूर्वी १८ ते २० सप्टेंबरपर्यंत भोजनावकाश दरम्यान धरणे आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात नारेबाजी केली होती. केला. अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मेंगलोर व गुवाहाटी विमानतळाच्या खासगीकरणाच्या विरोधात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व कर्मचारी संघटना आणि असोसिएशनच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील संबंधित विमानतळावर प्रदर्शन करण्यात येणार आहे.