नागपूर : सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे.
एआय-६२९ हे विमान रात्री ७:१५ वाजता मुंबईहून रवाना होऊन ८:३५ पर्यंत नागपुरात पोहोचेल आणि एआय-६३० हे विमान नागपुरातून रात्री ९:२० वाजता रवाना होऊन मुंबईला १०:२० वाजता पोहोचेल. कंपनीने या विमानाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार विमानसेवा २५ मार्चपर्यंत दरदिवशी दर्शविण्यात आली आहे. त्यानंतर ही सेवा नियमित होऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे.
कंपनीकरिता दिल्ली दूर
गेल्या वर्षी एअर इंडियाची दिल्ली विमानसेवा सुरू होती. ही सेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू झालीच नाही. दिल्ली विमानासह मुंबईचे रात्रीचे विमान बंद केले होते. सध्या केवळ सकाळची मुंबईची विमानसेवा सुरू केली आहे, तर १८ मार्चपासून रात्रीचे उड्डाण सुरू होणार आहे.