- औरंगाबादमधील एअर इंडियाच्या संपत्तीची आधारमूल्यापेक्षाही अधिक बोली
- बोलीत स्वारस्य दाखवूनही एका नामांकित आईल कंपनीची माघार
...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाची देशभरातील १० शहरात असलेली संपती विकण्यासाठी ८ व ९ जुलैला बोली लावण्यात आली होती. यासाठी ३७ कोटी रुपये किंमत ठरविण्यात आली; मात्र बोलीच लागली नाही. व्यक्तीश: लाभ मिळवून देण्यासाठी आधारमूल्य वाढविण्यात आले. यामुळेच बोली लागली नसल्याची माहिती आहे. आता पुन्हा तीन महिन्यांनंतर बोली लावली जाणार आहे.
सुमारे २७ हजार चौरस फुटाच्या भूखंडासह यावरील इमारतीच्या खरेदीसाठी काही कंपन्यांनी स्वारस्य दाखविले होते. प्रत्यक्षात बोली लावताना कोणीच पुढे आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील एअर इंडियाच्या संपत्तीची आधारमूल्यापेक्षाही अधिक बोली लागली. नागपूरसाठी देशातील नामांकित ऑईल कंपनीने स्वारस्य दाखविले होते. ही कंपनी बोलीत सहभागी होईल, अशी अपेक्षा असताना सहभाग घेतला नाही.
...
मागच्या दाराने प्रवेशासाठीच !
माहितीगारांच्या मते, ३७ कोटी आधारमूल्य या क्षेत्राच्या हिशेबाने बरेच अधिक आहे. ते २७ ते ३० कोटी रुपये असायला हवे होते. बोली न लागण्याचे हे कारण वाटत असले तरी यात मागील दाराने कुण्या व्यक्तीला ही जमीन विकण्याचा प्रयत्न होत आहे. बोली न लागल्याने किंमत पडेल. त्यानंतर यांच्या पैकीच कोणाला तरी ही जमीन विकली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, खासगी प्रकरणात ७० टक्के रक्कम चेकने आणि ३० टक्के रक्कम रोखीने दिली जाते; मात्र हा शासकीय व्यवहार असल्याने संपूर्ण व्यवहार चेकने करावा लागतो. यामुळेच बोलीतून काढता पाय घेतला असावा, अशी शंका आहे.
...
बीएसएनएलकडे समोरील जागेची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर बुकिंग कार्यालय लवकर विकले जाण्याची शक्यता लक्षात घेता एअरलाइन्सच्या प्रतिनिधींनी बीएसएनएलकडे समोरील जागेची मागणी केली होती; मात्र त्यांनी मागील जागा देण्याची तयारी दाखविली, अशी माहिती आहे.
...