नागपूर : २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षात कोरोनामुळे विमान प्रवासावर निर्बंध घातले होते. २०२१ नंतर हे निर्बंध शिथिल होत गेले आणि हवाई प्रवासाला वेग आला. २०२१ या वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणारे ४ लाख विमान प्रवासी वाढलेत. त्यामुळे मिहान इंडिया लिमिटेडला वर्षभरात विमान प्रवासातून ६३,७९,५८,८५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
विकसनशील शहर म्हणून नागपूरकडे बघितले जाते. शिवाय गेल्या काही वर्षांत नागपूर राजकीय घडामोडीचे मोठे केंद्र बनले आहे. व्हीआयपींच्या ॲक्टिव्हिटी नागपुरात वाढल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ होतेय. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि विमान कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलतीमुळे विमान प्रवासाकडे कल वाढत आहे. शहरातील अनेकजण तर दररोज विमानाने नागपूर-मुंबई ये-जा करतात. त्यामुळेच नागपुरात वर्षभरात विमानाने ११ लाख ११ हजार ४ प्रवाशांचे आगमन झाले व ११ लाख ५४ हजार ८२ प्रवाशांनी नागपुरातून विमानाने प्रस्थान केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिहान इंडिया लिमिटेडला विचारलेल्या माहितीच्या अधिकारात या प्रवासातून ६३.७९ कोटी रुपये मिहान इंडिया लि. ने मिळविले आहेत.
- नागपूर विमानतळावर ३५ विमानांचे अकस्मात लॅण्डिंग
नागपूर विमानतळावरून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात ११,५१६ विमानांचे आगमन झाले. तर ११,५१५ विमानांनी उड्डाण भरले. या वर्षभराच्या काळात ३५ विमानांचे अकस्मात लॅण्डिंग झाले. आकस्मिक लॅण्डिंगमधूनही एमआयएलने २ लाख १४ हजार २१९ रुपये महसूल मिळविला.
- वर्षभराच्या महसुलात लॅण्डिंग चार्ज २१ कोटी २६ लाख
मिहान इंडिया लि. ने वर्षभरात ६३ कोटी ७९ लाखांचे उत्पन्न मिळविले. यात विमानतळावर विमाने लॅण्ड करण्याचा चार्ज २१ कोटी २६ लाख ५३ हजार ४७८ रुपये आहे. पार्किंग शुल्कातून १३,३५,६२९ कमाई केली आहे. तर युझर डेव्हलपमेंट फीच्या रुपात एमआयएलला ४२ कोटी ३९ लाख ६९ हजार ७४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. जाहिरातीतून ९२ लाख ८३ हजार ५८७ रुपये व इतर उत्पन्नातून एमआयएलने २१ कोटी १९ लाख ७० हजार ५८७ रुपयांचा महसूल मिळविला आहे.
- ४८२ खासगी हेलिकॉप्टरही उतरले
वर्षभरात विमानतळावर ४८२ खासगी हेलिकॉप्टर व ९५२ खासगी विमान उतरले आहे. त्यापासून एमआयएलने ६२ लाख ५९ हजार ७३६ रुपयांचा महसूल मिळविला. एमआयएलने विमानतळाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफची नियुक्ती केली असून, एमआयएलचा विमानतळाच्या सुरक्षेवर वर्षभरात ३ कोटी ५० लाख ५५ हजार १९५ रुपये खर्च होतोय.