गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : चंद्रपुरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाचा विळखा केवळ चंद्रपूरपर्यंतच मर्यादित राहिला नसून, नागपुरातील नागरिकांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. २०२०-२१ या वर्षात येथील प्रदूषणामुळे चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, मुंबई, तसेच पुणे आणि नांदेडमध्ये २८० अकाली मृत्यू झाले, तर नागपूर व चंद्रपूरमध्ये आजारी रजेचे ६५ हजार दिवस नोंदविण्यात आले आहेत. या प्रदूषणाचे प्रभावक्षेत्र चंद्रपूर, नागपूरसह रायपूरपर्यंत असल्याची बाब ‘द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए)च्या अहवालातून पुढे आली आहे.
सीआरईएने २०२०-२१ मधील सीटीपीएसच्या परिस्थितीचे अवलोकन केले. ‘कोळशावर आधारित चंद्रपुरातील ऊर्जा प्रकल्पाचे आरोग्यावरील परिणाम’ या अहवालातून यावर प्रकाश टाकला आहे. दगडी कोळशावर चालणारा हा प्रकल्प नागपूरपासून १५० किमी अंतरावर आहे. २,९२० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातील संचांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून, चंद्रपूर आणि नागपूर येथील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे यात म्हटले आहे.
अकाली मृत्यू वाढले
या अहवालानुसार, सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे २०२०-२१ मध्ये मध्य भारतातील अनेक शहरांमध्ये अकाली मृत्यू झाल्याची नोंद आहे. चंद्रपूरमध्ये ८५, नागपूरमध्ये ६२, यवतमाळमध्ये ४५, मुंबईमध्ये ३०, तसेच पुणे आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २९ असे २८० अकाली मृत्यू झाल्याचे यात म्हटले आहे.
हवेची गुणवत्ता आणि नियमांचे स्पष्ट उल्लंघन
सीआरईएने केलेला हा अभ्यास नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानुसार, सीटीपीएसने जानेवारी-२०२२ पूर्वीपर्यंत हवेच्या गुणवत्तेचे आणि इतर नियमांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. या केंद्रामुळे आरोग्याच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सीटीपीएसला दिले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही.
आजारी रजेचे दिवस वाढले
या प्रकल्पातून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या श्वसनाच्या आजारावर परिणाम झाला. यामुळे आजारी रजेचे दिवस वाढल्याची नोंद अहवालात आहे. २०२०-२१ या वर्षात कर्मचाऱ्यांचे चंद्रपूरमध्ये ३४ हजार आणि नागपुरात ३० हजार आजारी रजेचे दिवस नोंदविले आहेत.
सीटीपीएसमधील वायू प्रदूषणाचा परिणाम श्वसनावर झाल्याने आजारांचे प्रमाण वाढलेले आढळले. आजारी रजेचे प्रमाण वाढले, यावरून लोकांची उत्पादकता कशी घटत आहे, हे दिसते.
- सुनील दहिया, अहवाल अभ्यासक, मुंबई
या प्रकल्पाच्या वायू प्रदूषणाचा परिणाम फक्त आसपासच्या लोकांवरच नसून, दूरपर्यंत आहे. हवेच्या दिशेसोबत दक्षिण-उत्तर आणि उत्तर-दक्षिण असे प्रदूषण पसरल्याने मोठ्यांसह वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम आहे.
- सुरेश चोपणे, अहवाल अभ्यासक, चंद्रपूर