अरुण महाजन
खापरखेडा (नागपूर) : औष्णिक वीज केंद्रातील चिमण्यांमधून माेठ्या प्रमाणात धूर बाहेर निघत असल्याचे तसेच या भागातील वायू प्रदूषणात दिवसागणिक भर टाकत असल्याचे गुगल मॅपवरून स्पष्ट हाेते. मात्र, या गंभीर व जीवघेण्या प्रकाराकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याने या विभागाचा उपयाेग काय, असा प्रश्न खापरखेडा येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खापरखेडा (ता. सावनेर) येथील औष्णिक वीज केंद्र राज्यातील पहिले वीज केंद्र हाेय. मात्र, मूलभूत तांत्रिक व यांत्रिक बदलांअभावी हे वीज केंद्र वीज निर्मितीऐवजी प्रदूषण वाढीत आघाडीवर जात आहे. खापरखेडा आणि काेराडी (ता. कामठी) येथील वीज केंद्र जवळजवळ आहेत. या दाेन्ही केंद्रांतून बाहेर पडणाऱ्या धुराची गुगल मॅपवर चाचपणी केली असता, धूर साेडण्यात खापरखेडा वीज केंद्र पुढे असल्याचे आढळून आले. हा प्रकार वीज केंद्र प्रशासनासह महानिर्मिती प्रशासन आणि राज्य सरकारला माहिती आहे. मात्र, वायू प्रदूषण राेखणे अथवा कमी करण्यासाठी काेणत्याही प्रभावी उपाययाेजना केल्या जात नसल्याचे स्पष्ट हाेते.
राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची निर्मिती केली आहे. परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या जीवघेण्या प्रकारासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेणे पसंत केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. या प्रदूषणाच्या विराेधात आवाज जरी उठवला तरी स्थानिक लाेकप्रतिनिधी आणि वीज केंद्रातील काही कंत्राटदार त्यांच्या स्वार्थासाठी एक तर प्रकरण दडपतात, नाही तर जुजबी दुरुस्ती करून चालढकल करतात, असा आराेपही नागरिकांनी केला आहे.
२५ पट अधिक राखमिश्रित धूर हवेत
खापरखेडा वीज केंद्रातील ५०० मेगावॉट आणि कोराडी वीज केंद्रातील चिमण्यांमधून हवेत साेडल्या जाणाऱ्या धुराची तुलना केल्यास खापरखेडा वीज केंद्रातील २१० मेगावॉट क्षमतेच्या चार युनिटमधील दाेन युनिटच्या चिमण्यांमधून २५ पट अधिक धूर हवेत साेडला जात असल्याचे स्पष्ट हाेते. विशेष म्हणजे, हा धूर राखमिश्रित व घातक असताे. काेराडी वीज केंद्राच्या तुलनेत खापरखेडा वीज केंद्रातील धुरात राखेचे प्रमाण अधिक आहे.
सॅटेलाईट मॅपिंगचा आधार
खापरखेडा आणि काेराडी वीज केंद्रांमधील चिमण्यांमधून हवेत साेडण्यात येणाऱ्या धुुराची पाहणी करण्यासाठी गुगल मॅप व सॅटेलाईट मॅपिंगचा आधार घेण्यात आला. यात खापरखेडा वीज केंद्रातील २१० मेगावाॅट क्षमतेच्या युनिटमधील चिमण्या सर्वाधिक वायू प्रदूषण करीत असल्याचे स्पष्ट दिसून आले. यासंदर्भात माहिती व प्रतिक्रिया घेण्यासाठी खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता रामटेके यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला. त्यांचा माेबाइल फाेन बंद असल्याने संपर्क हाेऊ शकला नाही.