पर्यावरणाला विळखा
निशांत वानखेडे
नागपूर : शहराच्या विस्तारासोबत हवेच्या प्रदूषणातही मोठी वाढ होत आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे तशी कार्बन, नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ २), सप्फर डायऑक्साईड (एसओ२), ओझोन-३, लेड, बेंझीन, अमोनिया यांसारख्या प्रदूषणात चिंताजनक वाढ व्हायला लागली आहे. मात्र नागपूरकरांसाठी खरी डोकेदुखी १० मायक्रॉनपेक्षा कमी व २.५ मायक्रॉन आकाराच्या पार्टीकुलेट मॅटर (धूलिकण : पीएम-१० व पीएफ-२.५) यांचीच आहे. पावसाळ्याचा काळ सोडला तर इतर वेळी धूलिकणांचे वाढते प्रमाण नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रचंड धोका निर्माण करीत आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)ने सादर केलेल्या शहराच्या पर्यावरण स्टेट्स रिपोर्ट-२०१९-२० वरून ही परिस्थिती समोर येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)तर्फे जीपीओ, सिव्हिल लाइन्स येथे मॉनिटरिंग केले जात आहे. सोबतच नीरीनेही एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ, इतवारी आणि नीरी अशा अनुक्रमे औद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रात २०१७-२०२० या काळात केलेल्या सर्वेक्षणावरून हा रिपोर्ट तयार केला आहे. गेल्या वर्षी मार्च ते सप्टेंबरपर्यंत कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे वरील सर्व प्रकारचे प्रदूषण कमालीचे घटले होते, ही उल्लेखनीय बाब ठरली.
एमपीसीबीच्या सिव्हिल लाईन केंद्रावरील निरीक्षण
प्रदूषक सीपीसीबी स्टॅन्डर्ड सर्वाधिक सरासरी अधिकतेचा टक्का
पीएम-१० ६० १६१.५ ६८.८ ५६.४
पीएम-२.५ ४० ९५.९ ३५ ३५.५
एनओ-२ ४० २२०.६ ४३.५ ५६.७
एसओ-२ ५० ५६.७ ७.४ ०.३
सीओ २००० २७१० ७४१.६ ०.८
अमोनिया १०० ८३ २४.७ --
ओझोन ३ १०० १८०.४ ४३.६ १४.९
बेंझीन ५ १६.१ ४.४ ३२.१
कोणत्या काळात कोणाचे प्रदूषण वाढते?
- नोव्हेंबर ते फेब्रुवारी ते मेपर्यंत पीएम-१० व पीएम-२.५ चे प्रदूषण वाढते.
- अमोनिया सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक
- एनओ-२ च्या प्रमाणात ऑक्टाेबर ते एप्रिल महिन्यात वाढ
- एप्रिल व मे महिन्यात ओझोन कॉन्सन्ट्रेशन अधिक.
- ऑक्टोबर ते मे म्हणजे संपूर्ण हिवाळा व उन्हाळ्यात कार्बन मोनाक्साईडच्या प्रमाणात वाढ.
- बेंझीन तसेच नायट्रेस ऑक्साईड (एनओ) नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये वाढते.