माजी वायुसैनिकांची मागणी : मॉलमध्ये ‘बॅन्ड’ वाजविण्याला विरोधनागपूर : तरुणांना भारतीय वायुदलाकडे आकर्षित करण्याचा एक भाग म्हणून रविवारी शहरातील एका ‘मॉल’मध्ये वायुदलाच्या ‘बॅन्ड’चे सादरीकरण करण्यात आले. परंतु या प्रकाराला माजी सैनिकांनी विरोध केला आहे. संबंधित बाब ही वायुदलाची पत घटवणारी असल्याची टीका त्यांनी केली आहे. वायुदलाचा मान राखणे आवश्यकच असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.‘मॉल’मध्ये ‘बॅन्ड’चे सादरीकरण होत असताना अनेक तरुणांना त्याच्या गंभीरतेचे भान राहिले नाही. काही तरुण तर चक्क फर्माईशी करायला लागले होते. याबाबत माजी सैनिकांनी ‘लोकमत’ला फोन करून आपली नाराजी कळवली आहे. वायुदलाला अशाप्रकारे ‘मार्केटिंग’ करण्याची गरज नाही. वायुदलाच्या ‘बॅन्ड’ला मोठा गौरवशाली इतिहास लाभला आहे. ‘मॉल’सारख्या ठिकाणी ‘बॅन्ड’ वाजविणे हे त्या इतिहासाचे अवमूल्यन आहे. हे असले प्रकार थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र माजी वायुसैनिक कल्याण संघटनेनेदेखील या कृतीचा कडक शब्दांत निषेध केला आहे.‘मॉल’मध्ये चंगळवादी प्रवृत्तीचे तरुण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. असे तरुण सैन्यात जाण्याकरिता उत्सुक आहेत काय व त्यांची तशी बौद्धीक व शारीरिक स्थिती व समर्पणाची तयारी आहे काय याचा विचार होणे आवश्यक आहे़ हाच कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी अथवा एखाद्या शाळा-महाविद्यालयात घेतला असता व सैन्यात भरती होण्याकरिता आवाहन केले असते तर नक्कीच वायुसेनेची प्रतिमा उंचावली असती असे मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)माजी वायुसैनिकांची बैठकया मुद्यावर महाराष्ट्र माजी वायुसैनिक कल्याण संघटनेची आकस्मिक बैठक झाली. ‘बॅन्ड’च्या या प्रकाराबाबत सर्व सभासदांनी निषेध व्यक्त केला. संघटनेच्या मतांशी सहमत असल्याचे विंग कमांडर मोटे, कर्नल अभय पटवर्धन व शहरातील अनेक अधिकाऱ्यांनी कळविले. या सभेत संघटनेचे अध्यक्ष सार्जेट मनोहर भातकुलकर, महेश आंबोकर, नीलेश व्यास,चंद्रशेखर कुळकर्णी, पुंडलिक सावंत, राजू धांडे, लक्ष्मीकांत नांदरुणकर, श्रीकांत गंगाथडे, संदेश सिंगलकर आदी उपस्थित होते.
वायुदलाचा मान राखणे आवश्यक
By admin | Published: August 21, 2015 3:22 AM