गाव सोडण्याची तयारी : सालेभट्टी येथे केवळ सहा कुटुंब वास्तव्यालाशरद मिरे भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावात पूर्वी ४०० कुटुंब वास्तव्याला होती. त्यातील सहा कुटुंब वगळता इतरांनी पुनर्वसित गावात राहायला सुरुवात केली. या सहा कुटुंबांनी आता गाव सोडण्याची तयारी दर्शविली असून, घराचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘गाव सोडणार नाही’ या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त अडून होते. कालांतराने या प्रकल्पग्रस्तांनी हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. सालेभट्टी येथील सहा कुटुंबाने गावात राहणे पसंत केले. गावाला उद्भवणारा धोक ा विचारात घेता प्रशासनाने या गावातील वीजपुरवठा बंद केला. त्यात गावातील शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, स्वस्त धान्याचे दुकान पुनवर्सित स्थळी स्थानांतरित करण्यात आले. दोन वर्षापासून येथील बहुतांश घरांमध्ये कुणीही राहात नाही. नागरिकांनी गाव सोडताच घराच्या खिडक्या, दारे व इतर साहित्य काढून नेले. त्यामुळे गावात केवळ पडक्य भिंती नजरेस पडतात. परिणामी, संपूर्ण गाव भकास झाले आहे. दरम्यान, अविनाश नाईक, शामराव ठाकरे, प्रवीण बहादुरे, तानाबाई खरकाळे, सुमन कांबळी, अरुण वरखडे या सहा कुटुंबातील २० सदस्यांनी गाव सोडण्याची तयारी दर्शविली. घराचे बांधकाम होईपर्यंत आमच्या निवाऱ्याची सोय करा, एवढी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निर्जन गावात ८० वर्षीय दशरथ मोटघरे यांची चहाची टपरी आहे. गावात दुभती जनावरे नसल्याने दूध मिळत नाही. त्यामुळे ते ‘ब्लॅक टी’ विकतात. दिवसभरात केवळ २० हाफ चहाची विक्री होते. कारण गावात फक्त २० च माणसं राहतात. एखादा साहेब आलाच तर अपवाद, अशी माहिती मोटघरे यांनी दिली. गावातील माणसं आपाापल्या घरी चहा पिऊ शकतात. पण, मोटघरे यांना रोजगार मिळावा म्हणून, ते रोज चहा मोटघरे यांच्या टपरीवर चहा पिणे पसंत करतात.अवनीची घुसमट‘अवनी’ ही दीड वर्षाची आहे. गावात तिच्यासोबत खेळायला कुणीही समवयस्क नाहीत. त्यामुळे ती दिवसभर प्राण्यांसोबत खेळत कसातरी दिवस घालविते. वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे अवनी घाबरते. या ‘चिमुकल्यांसाठी आम्हाला गाव सोडायचं आहे’ अशी प्रतिक्रिया अवनीचे वडील अविनाश नाईक यांनी व्यक्त केली.अन् त्यांना मिळाला दिलासाया विदारक वास्तवाची माहिती मिळताचं सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रविवारी या सहाही कुटुंबीयांची सालेभट्टी येथे जाऊन भेट घेतली. अख्खे गाव फिरल्यानंतर दार नसलेल्या एका झोपडीत पाळणा हलताना दिसला. पाळण्यात सहा महिन्यांचा चिमुकला झोपला होता. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. तासाभरानंतर गावातील सहाही कुटुंबातील सदस्य गोळा झाले. त्यांनी त्यांची व्यथा राजू पारवे यांच्या समक्ष कथन केली. हा तिढा सोडविण्यासाठी आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना दिली. यावेळी कृष्णा घोडेस्वार, रमेश भजभुजे, देवेंद्र देशमुख उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना हवा निवारा
By admin | Published: May 09, 2016 2:57 AM