लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी एम्प्रेस मिल परिसरातील १ लाख चौरस फूट जागेवर वंदेमातरम उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. येथे शहीद सैनिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी भारतीय सेनेचा टँक टी -७२, वायुसेनेचे दोन लढाऊ विमान मिग-२३ आणि मिग-२७ होवित्झर तोफ आणि दोन रायफल देण्याची मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी राजनाथ सिंह यांना दिलेल्या निवेदनातून केली.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंगळवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट घेतली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या वंदेमातरम उद्यान युद्धात शहीद झालेले सैनिक, शौर्य पदक प्राप्त सैनिक, माजी सैनिक, युद्धात वीरगती प्राप्त करणाऱ्या सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या आश्रितांना समर्पित केला जाईल. नवीन पिढीला सैन्य व त्यांच्याद्वारे केलेल्या बलिदानाची माहिती देण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूरकरांसाठी हे उद्यान प्रेरणास्थळ ठरणार आहे, अशी माहिती महापौरांनी राजनाथ सिंह यांना दिलेल्या निवेदनातून दिली.