विश्वास पाटील : २९ आॅगस्टपर्यंत मुदत नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी बोलविण्यात येणाऱ्या ई-निविदा पुन्हा एक महिना लांबणीवर गेल्या आहेत. निविदा भरण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) २९ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिल्याची माहिती ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. निविदेला मुदतवाढ विमानतळाचा विकास ‘पीपीपी’ मॉडेलनुसार करण्यात येणार आहे. पूर्वी विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या १० ते १२ कंपन्यांनी विचारणा केली होती. ई-निविदा असल्यामुळे आतापर्यंत किती कंपन्यांनी निविदा भरल्या, याची माहिती नाही. पण जागतिक दर्जाच्या कंपन्या विमानतळाचा विकास करण्यासाठी इच्छुक आहेत. विकासासाठी हवा असलेला अनुभव आणि संबंधित कागदपत्रे गोळा करण्यासाठी काही कंपन्यांनी निविदेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर विचार करून एमएडीसीने निविदेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) जागेची अडचण नाही भारतीय वायुसेनेची २७८ हेक्टर आणि सीआरपीएफची २.३० हेक्टर जमिनीच्या अदलाबदलीच्या संदर्भात अध्यादेश निघाला आहे. झुडपी जंगलाची जमीन या जागेलगतच आहे. संरक्षण मंत्रालयाला जयताळा गावालगत ४०० हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. जागेच्या अदलाबदलीसाठी आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यादरम्यान काहीच समस्या राहिलेली नाही. या प्रस्तावावर लवकरच स्वाक्षरी होणार आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे.
विमानतळ विकास निविदा एक महिना लांबणीवर
By admin | Published: July 23, 2016 3:10 AM