लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचा समावेश ‘मेट्रो’ शहरांमध्ये झाला असल्यामुळे विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यातच नागपुरातून उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या १३ लाखांजवळ पोहोचली आहे. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झालेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये शहरात आगमन झालेल्या व उड्डाण केलेल्या सरासरी प्रवाशांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर १५ टक्क्यांनी वाढ झाली. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत नागपूर विमानतळावरुन किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत नागपूर विमानतळावरुन १२ लाख ९२ हजार १०६ प्रवाशांनी उड्डाण केले. तर १२ लाख ७७ हजार २९७ प्रवासी शहरात आले. दर महिन्याला सरासरी १ लाख २९ हजार २११ प्रवाशांनी उड्डाण केले तर १ लाख २७ हजार ७३० प्रवासी नागपुरात उतरले. २०१८ मधील पहिल्या दहा महिन्यात हीच आकडेवारी अनुक्रमे १ लाख ११ हजार ४८७ व १ लाख ११ हजार १८२ इतकी होती. प्रवाशांच्या संख्येत सरासरी १५.४० टक्क्यांची वाढ झाली आहे.१२०० हून अधिक खासगी विमानांचे ‘लॅन्डिंग’२०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानतळावर १ हजार २३१ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरली. दर महिन्याचे सरासरी प्रमाण १२३ इतके होते. २०१८ मध्ये वर्षभरातील हीच संख्या १ हजार २४६ इतकी होती व दर महिन्याला सरासरी १०३ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरली होती. २०१९ मध्ये यातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ४० लाख ९ हजार ८३५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
उपराजधानीची 'हवाई' वाटचाल वेगात : दर महिन्याला सव्वा लाखांहून अधिक प्रवाशांचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:04 PM
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यातच नागपुरातून उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या १३ लाखांजवळ पोहोचली आहे.
ठळक मुद्देवर्षभरात प्रवासी संख्येत १५ टक्क्यांनी वाढ