लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाजूच्यांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकते, याची कल्पना असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम करणाऱ्या बिल्डरविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बिल्डरने या १२ सदनिकाधारकांना तातडीने नवीन सदनिका घेऊन द्याव्या तसेच पोलिसांनी या बिल्डरविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे दक्षिण नागपूरचे महामंत्री विलास करांगळे यांनी केली आहे. क्रीडा चौकाजवळच्या शिवानंद अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला (प्रगती सभागृहामागे) अग्रवाल कन्स्ट्रक्शनने बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या इमारतीचे काम सुरु आहे. बिल्डर अग्रवाल यांनी इमारत बांधकामासाठी ३० फूट खाली बेसमेंटचे तयार केले. जेसीबीद्वारे माती काढताना शिवानंद अपार्टमेंटच्या मागील बाजूची सुरक्षा भिंत व पार्किंग ५ फूट खाली गेले. तसेच शिवानंद अपार्टमेंटमधील एक पिलरही झुकले. त्यामुळे शिवानंद अपार्टमेंटमध्ये राहणारांनी अग्रवाल कन्स्ट्रक्शनकडे तक्रार केली. अग्रवाल यांचे आर्किटेक्ट पाटणकर यांनी ‘तुम्ही बिल्डींग खाली करा’ असा सल्ला दिल्याचे समजते. सुमारे ४० ते ५० जीवांना धोका होऊ शकतो. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, याची कल्पना असूनही बिल्डरचा निष्काळजीपणा सुरूच राहिला. शिवानंद अपार्टमेंट ही इमारत कोसळण्याचे संकेत बुधवारी सायंकाळी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. या भागातील नागरिकांनी इमारतीसमोर मोठी गर्दी केली. अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जीवाच्या भीतीने इमारतीत राहणाऱ्या सदस्यांनी मौल्यवान चिजवस्तू आपापल्या सदनिकांमध्ये सोडून बाहेर धाव घेतली. त्यानंतर या सर्वांची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली. संतप्त इमारतीतील रहिवाशांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. रात्री उशिरा या प्रकरणी बिल्डर अजय कपिलनारायण अग्रवाल (वय ५७) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.कडक कारवाई करा४० ते ५० लोकांच्या जीविताला जाणीवपूर्वक धोका निर्माण करणारे बिल्डर अग्रवाल यांच्याविरुद्ध पोलिसांनी जामिनपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी. बिल्डरने प्रत्येकाला ५० लाखांची भरपाई देऊन तेथे नवीन सदनिका द्यावी, अशी मागणीही भाजपाचे महामंत्री विलास करांगळे यांनी केली आहे.