नागपूर :
अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. अत्यंत गंभीर असा हा प्रकार अनेकांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरला आहे. मात्र, हा सर्व प्रकार लक्षात येऊनही त्याकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
अजनीचा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर लोखंडी पोल रोवण्यात आले. कार, जीप व अशीच लाईट वेट वाहने त्या पोलमधून जातील, अशी ही व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेने रोज हजारो नागरिकांचा त्रास वाढवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालय आहे. एका बाजूला रेल्वेस्थानक तसेच अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये तर दुसऱ्या बाजूला मेडिकल आणि विविध कार्यालये आहेत. त्यामुळे रोज सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजतापासून वाहनचालकांची प्रचंड वर्दळ असते. सकाळी ही वर्दळ लवकर संपत असली तरी सायंकाळी मात्र रात्री ९ ते १० वाजेपर्यंत पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने मुंगीच्या गतीने सरकतात. त्यामुळे महत्त्वाचे काम करण्यासाठी निघालेल्यांना या कोंडीत अडकून पडल्यामुळे प्रचंड त्रास होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार रोजचाच झाला आहे.
पोलिसांच्या नियंत्रणाबाहेरची स्थितीविशेष म्हणजे, मेडिकलमध्ये दूरदूरवरून अनेक अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना घेऊन दिवसभरात शंभरावर रुग्णवाहिका येतात. सायंकाळी अनेक रुग्णवाहिका वाहनांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी येथे ट्रॅफिक पोलीस असतात. मात्र, टी-पॉईंट असलेल्या या पुलावर वाहनांची संख्या एवढी मोठी असते की स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हा प्रकार फारच वेदनादायी ठरला आहे.
मोठा धोका होण्याची भीतीजड वाहनांच्या वजनामुळे पुलावर धोका होण्याची भीती असल्याने महापालिकेने येथे ही उपाययोजना केली असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. मात्र, अनेक छोट्या-मोठ्या, कार, जीप, दुचाकी आणि अशीच काही वाहने एकाच वेळी या पुलावर जमा होऊन रेंगाळत असल्याने त्यांच्या वजनाने या पुलावर एखाद वेळी मोठा धोका होऊ शकतो. संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात हा धोका वारंवार येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दुर्घटना घडल्यावरच संबंधित प्रशासन याबाबत उपाययोजना करेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.