प्रभूंची ‘सुविधा’ एक्स्प्रेस नागपूरसाठी लाभदायक : खापरी, गोधनी, माजरीला आदर्श स्टेशनचा दर्जानागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासभाडे, मालभाडे वाढविण्यात न आल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. नागपूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन या स्थानकाचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ४१.६२ कोटी रुपये खर्च येणार असून या अर्थसंकल्पात १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आहे. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (इरिएट) या संस्थेची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या संस्थेसाठी २६ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.रेल्वे अर्थसंकल्पात खापरी, गोधनी, माजरी रेल्वेस्थानकांना आदर्श रेल्वेस्थानक बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ७५ कोटी ७३ लाख ३ हजार कोटीच्या या प्रकल्पासाठी मात्र फक्त १ रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे. घोषणा करण्यात आलेल्या आदर्श स्थानकावर जास्तीत जास्त प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यात गोधनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात ११ रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमच्या प्रकल्पानुसार १० कोटी ८८ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ११ रेल्वेस्थानकात नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १, २, ३ वर इटारसी एण्डकडे आधुनिकीकरणासाठी ९ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यासाठी सध्या रकमेची तरतूद करण्यात आलेली नाही. रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडे १ ते ८ पर्यंत सर्व प्लॅटफार्मच्या फूट ओव्हरब्रीज आणि प्लॅटफार्म दरम्यान शिडी आणि लिफ्टसाठी ९ कोटी ५६ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अजनी होईल सॅटेलाईट टर्मिनल
By admin | Published: February 26, 2016 2:54 AM