नागपूर : डॉक्टर चार कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याचा आरोप असलेल्या बहुचर्चित अजित पारसेला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे पारसेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पारसेने डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालयासाठी पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली चार कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांनी गंडविल्याची तक्रार आहे.
त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवितील कलम ३८४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय, त्याने वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांची कोट्यवधी रुपयांचा सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी १८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. पारसेतर्फे ॲड. देवेंद्र चव्हाण व ॲड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.