अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार गडकरींना भेटले, राजकीय चर्चांना उधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:22 PM2022-04-29T22:22:15+5:302022-04-29T22:23:24+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलीलदेखील असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर - एकीकडे महाविकास आघाडी व राज्यातील भाजप नेत्यांमध्ये वाद रंगला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलीलदेखील असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, शिवसेना नेते विविध निधीच्या वाटपावरून सातत्याने केंद्रावर टीका करत असतानाच, राज्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय फंडातून निधी मिळावा, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.
अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांचा सायंकाळच्या सुमारास पूर्व नागपुरात नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्याअगोदर ते गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे पाऊण तास त्यांची गडकरींशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मागील वर्षी गडकरी यांनी महाराष्ट्राला केंद्रीय फंडातून चांगल्या प्रमाणात निधी दिला होता. या आर्थिक वर्षातदेखील तसाच निधी मिळाला तर राज्यातील अनेक रस्ते केंद्रीय निधीतून पूर्ण करता येतील, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
गडकरींच्या खात्याकडे रेल्वे ओव्हरब्रिज व रेल्वे अंडरब्रीज यासाठी काही निधी आहे. त्याची आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही दोघेही नागपुरात होतो व गडकरीदेखील नागपुरातच होते. त्यामुळे आम्ही लगेच त्यांची भेट घेतली. गडकरींनी यासंदर्भात राज्याच्या अखत्यारितील ज्या मार्गांवर रेल्वे ओव्हरब्रीज किंवा रेल्वे अंडरब्रीज आवश्यक आहे, त्यासाठी निधी देता येईल, असे सांगत आम्हाला यादीची मागणी केली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
जीएसटीत सूट मिळावी
यावेळी जीएसटीच्या मुद्द्यावरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाचा जीएसटीचा जो हिस्सा आहे, त्यात सूट मिळावी. समृद्धी महामार्गाला रॉयल्टी माफ केली, तसा त्यातदेखील दिलासा द्या, अशी मागणी पवार यांनी केली. असे झाले तर केंद्र सरकारच्या निधीतून कामे करणे सोपे जाईल, अशी भूमिका पवार यांनी मांडली. पुण्यात रस्ते विकास महामंडळ रिंग रोड तयार करत आहे. त्या रिंगरोडमधील काही भाग ‘एनएचएआय’ करायला तयार आहे. त्यावरदेखील चर्चा झाली व गडकरींनी तसे अधिकाऱ्यांना निर्देश दिले, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
राजकीय चर्चांबाबत गुप्तता -
सध्या विविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापले आहे. अगदी नागपुरातील पोलीस भवनाच्या कार्यक्रमातदेखील भाजपच्या आमदारांनी बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांमध्ये राजकीय मुद्द्यांवरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.