नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा येत्या २ सप्टेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निरीक्षक आ. राजेंद्र जैन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.
अजित पवार हे भाजप शिवसेना (शिंदे) सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या गटाचा हा विदर्भातील पहिलाच मोठा मेळावा असल्याने हा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासंदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या मेळाव्याला पक्षाने संकल्प मेळावा असे नाव दिले असून या मेळाव्यातून पक्षाला विदर्भात अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला जाईल. या मेळाव्याला ३ ते ४ हजारावर कार्यकर्ते येतील. बाहेर सुद्धा येण्याची व्यवस्था केली जाईल. या मेळाव्यात अनेकजण पक्षप्रवेश घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला श्रीकांत शिवनकर, ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, राजेश माटे उपस्थित होते.
- प्रस्तापित नेत्यांमुळेच पक्ष वाढला नाही
जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले, आतापर्यंत नागपुरातील प्रस्तापित नेत्यामुळेच पक्ष वाढू शकला नाही. दोन मतदारसंघापुरताच पक्ष मर्यदित राहीला. सामान्य कार्यकर्त्याला कधी संधीच मिळाली नाही. परंतु आता सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने तो किती सक्षम आहे हे दाखवण्याची संधी मिळाली असून कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्ष वाढवतील. येत्या दोन महिन्यात तिकडे असलेले प्रस्तापित नेतेही परत येतील, असा विश्वासही त्यांनी वर्तविला.
- मंडळ- कमिट्यांवर कार्यकर्त्यांना संधी
पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंडळ-कमिट्यांवर लवकरच संधी दिली जाईल. यासंदर्भात तिन्ही पक्ष मिळून एक फार्मुला तयार झाला असून भाजप ४०, शिवसेना (शिंदे) ३० व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ३० टक्के असा हा फार्मला ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.