डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका
By योगेश पांडे | Published: March 12, 2023 01:51 PM2023-03-12T13:51:53+5:302023-03-12T13:52:56+5:30
स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधीमंडळात अर्थसंकल्प मांडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी शिवसेनाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डोळा मारल्याच्या मुद्द्यावरून भाजप राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात झाली आहे. डोळा मारून अजित पवारांनी एका प्रकारे उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली आहे.
स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. रविवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतात डोळे मारणारे दोनच नेते आहेत. एका नेत्याने मिठी मारल्यानंतर डोळा मारला होता आणि दुसरे आता अजित पवार हे आहेत. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पाच्या विरोधात बोलत असताना अजित पवार यांनी डोळा मारला. मुळात अर्थसंकल्प चांगला आहे याची पवार यांना जाणीव होती आणि आता ठाकरे विरोधातच बोलतील व त्याला काहीच अर्थ नाही म्हणून त्यांनी डोळा मारला. उद्धव ठाकरे बोलताना अजित दादा यांच्या बॉडी लॅग्वेजमधून बरेच काही संकेत मिळत होते. तिथे गोंधळ व्हावा म्हणून लहान मुलांसारखे कागद खाली पाडण्यात आले. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर कुणी डोळा मारू शकले असते का असा सवाल बोंडे यांनी केला.
बारामतीचा विकास हा राज्याचा विकास नाही
महाविकास आघाडीच्या व तत्पुर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात बारामतीचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर व्हायचा. बारामतीचा विकास झाला म्हणजे राज्याचा विकास झाला असे होत नाही. राज्यात अवकाळी पाऊस पडला तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विदर्भात येऊन दौरे केले होते. दोघांनीही मोठमोठाल्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात चार हजार कोटींचे वाटपदेखील झाले नव्हते, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.