नरेश डोंगरे
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस भवनाच्या उद्घाटन समारंभात केलेले ‘अर्थपूर्ण’ भाषण अनेकांना चमकवणारे ठरले आहे. त्यांनी माइकवर येतायेताच उशिरासाठी नागरिकांसमोर दिलगिरी व्यक्त केली. एकीकडे पोलिसांचे काैतुक केले तर, दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्या देऊन टोमणेही हाणले. त्याचमुळे आता ‘दादां’ना म्हणायचे तरी काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठांना चांगली वर्तणूक देत नसल्याचे दादांना कळले असावे म्हणून त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांचे कान टोचले. तुम्हीही कधीकाळी कनिष्ठ होता, हे विसरू नका. विशिष्ट ‘जागेसाठी’ काही जण हट्ट धरतात, हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीचे आणि पोलीस भवनच्या देखण्या वास्तूच्या दर्जेदार बांधकामाबद्दल त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, अर्चना त्यागी अन् पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे काैतुक केले. मात्र, एनआयटीला पुरेसा निधी देऊन काम समाधानकारक नाही, असे सांगत ‘हे खपवून घेतले जाणार नाही’, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
सराफा व्यापाऱ्याला भोसकून साडेतीन कोटींचा ऐवज लुटण्याच्या गुन्ह्याचा अवघ्या २७ तासांत छडा लावल्याबद्दल त्यांनी शहर पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली. जप्त केलेला ऐवज सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दादा आणि वळसे पाटलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी पोलीस दलाच्या परिश्रमाची प्रशंसा करून त्यांचे आभार मानले. हा धागा पकडून त्यांनी त्यांच्या शैलीत सराफा व्यापाऱ्यांनाही सल्ला दिला. पोलीस सर्वांसाठीच काम करतात. मग, त्यांची काळजीही सर्वांनीच घ्यायला हवी. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डीपीसीतून निधी देतात की नाही, याची उपमुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच शहानिशा करून घेतली.
माजी गृहमंत्र्यांचे आभार
पोलिसांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण काढली. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख यांचे आभार मानले.
‘मास्क’चा खुलासा
उपमुख्यमंत्र्यांनी आज मास्क काढून भाषण केले. ते म्हणाले, आता कोरोनाची तेवढी भीती नसल्याने आपण दोन वर्षांत पहिल्यांदाच विनामास्कने भाषण करीत आहे. मात्र, तरीही काळजी घ्यावीच लागेल, असे म्हणत त्यांनी आता येथून बाहेर पडताच मी मास्क लावेन, असे सांगितले.