Maharashtra Winter Session 2023: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसीमधून देण्यास होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला असताना, राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने हा मुद्दा सुटेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या प्रस्तावित एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली. भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्यासह उद्योग आणि एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सदर एमआयडीसीची जागा वादग्रस्त असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय झाला, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली. एमआयडीसी होण्यासाठी आवश्यक विविध परवानग्या, निरीक्षणे विविध शासकीय समित्यांच्या परवानग्या घेण्यासाठी रोहित पवार प्रयत्नशील होते. मीडियाशी बोलताना अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मुद्दा सुटेल
कर्जत जामखेडच्या एमआयडीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथे तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल, असा महायुतीचा प्रयत्न चालला आहे. याबाबत तेथील आमदार राम शिंदे हे अतिशय बारकाईने प्रयत्नशील आहेत. राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ज्या ठिकाणी कर्जत जामखेडची एमआयडीसी प्रस्तावित होती, तिथे नीरव मोदींची जमीन आहे, याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. नीरव मोदीची भारतात येण्याची शक्यता फार कमी आहे. इथे आला तर त्यांच्यावर कारवाई होईल. आपण नियमांच्या चौकटीत बसून MIDC च्या संदर्भात काम करु, असे अजित पवार यांनी सांगितले.