"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

By कमलेश वानखेडे | Published: July 27, 2023 04:42 PM2023-07-27T16:42:08+5:302023-07-27T16:45:47+5:30

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या एका ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली होती.

Ajit Pawar will get a chance to become Chief Minister sometime says Praful Patel | "अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

"अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल"; प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

googlenewsNext

नागपूर : आज मुख्यमंत्र्यांची जागा रिक्त नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करून उपयोग नाही. अजित पवार हे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करत आलेले आहेत. सरकारचाही अनुभव आहे. काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते. अनेक लोकांना मिळालेली आहे. मग अजितदादांना आज नाही उद्या, कधी ना कधी संधी मिळेल. आम्ही देखील त्या दिशेने काम करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या एका ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्व सुरु होईल’ असे ट्वीट मिटकरी यांनी केले होते. याशिवाय अजित पवार यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून ते मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनीही अजित पवार यांना आज ना उद्या संधी मिळेल, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान मोदींच्या थर्ड टर्मसाठी लढणार- आमचा पक्ष काही दिवसांपूर्वी एनडीए मध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत. भारत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येत्या पाच वर्षात आपण नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि त्यासाठी एक स्थिर आणि विकासशील सरकारची गरज आहे. आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेले आहे. वेगवेगळे पक्, वेगवेगळी विचारधारा आणि एवढ्या लोकांना एकत्रित करून देशाला चांगला विकल्प देणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून एक चांगले स्थिर सरकार आणि या सरकारचा चेहरा असला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे. म्हणूनच आम्ही अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतला, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांबाबत बोलणार नाही

शरद पवार हे आमचे नेते आहेत, दैवत आहेत, आयुष्यभर राहतील. त्यांच्याविषयीची श्रद्धा कुठेही कमी होणार नाही. एखादा राजकीय निर्णय करीत असताना आमची पण इच्छा आहे की पूर्ण पक्ष एकसंघ राहिला पाहिजे. आम्ही त्यांना विनंती करत आलो आहोत. आजही करीत आहो आणि उद्याही करू. आमच्या पक्षाच्या अंतर्गत जे काही चालले आहे त्याच्याविषयी मी काहीच भाष्य करणार नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ajit Pawar will get a chance to become Chief Minister sometime says Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.