लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाअगोदर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही कामकाज सल्लागार समितीवर टाकलेल्या बहिष्काराचा सरकारने फायदा घेतला. अधिवेशनात कुठलेही आयुध वापरता येणार नाही व प्रस्तावदेखील मांडता येणार नाही. लक्षवेधी व्यपगत केल्या असून आजपर्यंत असे कधीही झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीला अक्षरश: फासावर लटकविण्याचे काम केले आहे, या शब्दात फडणवीस यांनी टीका केली. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांची ईडीने चौकशी सुरू केल्याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाल्याचे स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. याचिकाकर्त्यांनी टाकलेल्या नावांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. संबंधित प्रकरणात आर्थिक बाबी असल्याने ईडीने चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी कुठल्याही राजकीय हेतूने नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीत अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला होता. नेहमीच कुठलाही पक्ष एखाद्या घटनेच्या चौकशीची मागणी करीत असतो. कुणाची चौकशी करावी याचा अर्थ त्याला फासावर लटकवावे किंवा तुरुंगात टाकावे, असा होत नाही.
हे उशिरा सुचलेले शहाणपण
ओबीसींचा डेटा तयार करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. याचे निश्चितच स्वागत आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. परंतु सरकारने बराच वेळ केला आहे. जाणीवपूर्वक राज्य सरकारने केंद्राकडे अंगुलीनिर्देश केला, असा दावा फडणवीस यांनी केला.