नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पदाधिकारी पक्षाच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने एखाद्या कामासाठी मंत्र्यांना पत्र दिले तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. त्या पत्राला साधे उत्तरही दिले जात नाही. सर्वच विभागाची तीच स्थिती आहे.
जिल्हाध्यक्षांच्या पत्रांचा तरी मान ठेवला जावा, अशी नाराजी नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर व शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी व्यक्त केली. विधान परिषदेवर पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. पण पक्षाकडून या मागणीला बळ मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता पदाधिकारी उघडपणे तोफ डागू लागले आहेत. बाबा गुजर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून आपण अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठिशी उभे राहिले. पण जेव्हा जेव्हा संवैधानिक जबाबदारी देण्याची वेळ येते तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनाच पुढे केले जाते. विदर्भात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा असेल तर येथील कार्यकर्त्यांचाही विचार व्हावा. नागपूर जिल्ह्यात भाजप व काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत.
पण त्या तुलनेत आम्हाला आमच्या पक्षाकडून पाहिजे तसे पाठबळ मिळाले नाही. आजवर फक्त काटोल व हिंगणा विधानसभा मतदारसंघ मिळत गेले. पण उर्वरित चार मतदारसंघात साधे जिल्हा परिषदेलाही तिकीट मिळत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. प्रशांत पवार म्हणाले, एखाद्या कामासाठी आमच्या सोबत गावातील दहा लोक आले व मंत्र्याने दोन तास कक्षाबाहेर उभे ठेवले तर आमची गावात काय प्रतिष्ठा राहणार. कार्यकर्त्यांची कामे होणार नाही तर पक्ष वाढणार कसा, असा सवाल पवार यांनी केला. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातही वरिष्ठ नेत्यांकडून भेदभाव केला जातो. आमच्या भावना नेत्यांच्या कळायलाच हव्या, असेही पवार म्हणाले.
गांधी, गजभिये, बेग यांचा पक्षाला फायदा झाला नाही
ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे म्हणाले, पक्षाने गिरीश गांधी, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर संधी दिली. पण त्याचा पक्षाला काहीच फायदा झाला नाही. अनेकांनी पक्षाचा लाभ घेतला व नंतर रामराम ठोकला. आमच्या सारखे राज्यभर फिरणारे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते वंचित राहिले, अशी नाराजी बाळबुधे यांनी व्यक्त केली.