अजित पवारांचा ‘यू टर्न’ : ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 08:39 PM2018-10-30T20:39:22+5:302018-10-30T20:40:42+5:30
काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत जर दारुण पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. ‘ईव्हीएम’मध्ये काही त्रुटी असती तर ती कुणीतरी सिद्ध करुन दाखविली असती. निवडणूक आयोगाने आवाहन केल्यानंतरदेखील कुणीही यासाठी समोर आले नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी तांत्रिक दोष असू शकतो. मात्र संपूर्ण ‘ईव्हीएम’ यंत्रणा सदोष आहे, असे म्हणता येणार नाही. जर ‘ईव्हीएम’मध्ये दोष असा तर भाजपचा सर्वच राज्यात विजय झाला असता. मात्र पंजाब, कर्नाटकमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अगदी बिहार, गुजरातमध्येदेखील ‘ईव्हीएम’ असतानादेखील त्यांच्या तोंडाला फेस आला होता. २०१४ मध्ये जनतेने भाजपला नव्हे तर नरेंद्र मोदी यांना मत केले होते, असे अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी
राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्य शासन ते मान्य करायला तयार नाही. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात जलयुक्त शिवारचा बोलबाला झाला. मात्र अनेक ठिकाणी भूजल पातळी ही एक ते दीड मीटरने खालावली आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहता त्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
सरकारने ‘फिल्ड’वर यावे
मुख्यमंत्री दररोज विविध जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. मात्र दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले पाहिजे. तसेच घोषणांचे प्रत्यक्ष शासन निर्णय लगेच निर्गमित झाले पाहिजेत, असे पवार म्हणाले. राज्यातील उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना ‘सीएसआर’चा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी खर्च करण्यास सांगितले पाहिजे. शासनाने लोकप्रतिनिधींंना विश्वासात घेऊन पाण्याच्या वाटपाबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे मतदेखील पवार यांनी व्यक्त केले.
महाआघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा सुरू
पुढील लोकसभा निवडणूकांसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत हातमिळावणी केली आहे. मात्र याचा फायदा भाजपा-शिवसेनेला होईल. त्यामुळे त्यांना महाआघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही चर्चा करत असून आमची आशा कायम आहे, असे अजित पवार यांनी प्रतिपादन केले. मनसेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व मित्रपक्षांना जे मान्य असेल ते आम्ही ठरवू, असेदेखील ते म्हणाले.
शिवस्मारकाची उंची कमी करू नये
शिवस्मारकावरुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन वर्षानंतरदेखील कामाला विलंब लागत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. जनतेच्या भावनांंशी जुळलेला हा विषय आहे. याला धक्का पोहोचविण्याची कृती भाजपा-शिवसेनेने करू नये असा इशाराच यावेळी अजित पवार यांनी दिला.