लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील कुख्यात गुंड केतन अशोक शंभरकर (वय ३१) आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी रविवारी रात्री प्रचंड हैदोस घातला. वाहनांची तोडफोड करून शस्त्राच्या धाकावर अनेकांना मारहाण केली तसेच खंडणीची मागणी करून अनेकांना धमक्याही दिल्या. सुमारे तासभर त्यांचा हा हैदोस सुरू होता. त्यामुळे न्यू बाबूलखेडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
कुख्यात केतन शंभरकर, सुरज उर्फ ईल्ली विजय गजभिये, अमित शंभरकर या तिघांनी प्रारंभी नाईक नगरात पानटपरी चालवणारा वैभव अनिल वासेकर याच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. वैभव हा मानवता स्कूलजवळ पानटपरी चालवतो. येथे पानटपरी लावायची असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत तलवार दाखवत वैभवला मारहाण करण्यात आली. त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी वैभव अजनी पोलीस ठाण्याकडे गेला तर आरोपी केतन, ईल्ली, अमित तसेच मयूर राजरतन बनकर, बंटी उर्फ निशांत बनकर, कुणाल नामदेव बनकर, अक्की उर्फ अक्षय श्रावण ग्वालबन्सी आणि योगेश बंडू सोनवणे यांनी बाबुलखेडा परिसरात हैदोस घालणे सुरू केले. त्या भागात राहणाऱ्यांच्या चार दुचाकी, एक रिक्षा, दोन चारचाकी आणि अन्य वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. त्यांच्या हातात शस्त्र होती. यावेळी शस्त्रांच्या जोरावर येणार्या-जाणार्या लोकांना शिवीगाळ करून ते त्यांच्या मागे धावत होते. त्यामुळे न्यू बाबुलखेडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. यावेळी अनिकेत नरेंद्र बनकर याने आरोपींना हटकले असता, अक्की उर्फ अक्षय ग्वालबन्सी याने अनिकेतला दगड फेकून मारला. तो डोळ्याजवळ लागल्याने अनिकेत जबर जखमी झाला. दरम्यान, आरोपींचा हैदोस सुरू असताना मिळालेल्या माहितीवरून अजनी पोलिसांचा ताफा तिकडे पाेहोचला. त्यामुळे आरोपी वेगवेगळ्या भागात पळून गेले. त्यानंतर सातही आरोपींना पोलिसांनी शोधून काढले. त्यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
कुख्यात केतन शंभरकर तसेच त्याच्या टोळीतील गुंडांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, दंगे करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे ते लपूनछ्पून गुन्हे करत होते. रविवारी रात्रीच्या घटनेमुळे या टोळीने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपींना बाजीरावची ओळख
या प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, सोमवारी सकाळपासूनच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी अजनी पोलीस ठाणे गाठून आरोपींना बाजीरावची ओळख करून दिली. ठाणेदार विनोद चौधरी यांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडी मिळवली.