नागपूर : अजनी वनातील कामाच्या प्रक्रियेस स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला असला तरी या निर्णयाने महापालिका प्रशासनावर दबाव वाढला असून पर्यावरणवाद्यांचा उत्साह दुणावला आहे. मात्र हा लढा आता राजकीय पटलावर पाेहचल्याने रंगत आणखी वाढली आहे. एकिकडे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून मनसे व इतर पक्षांनीही अजनी वनाच्या लढ्यात उडी घेतली आहे. दुसरीकडे झाडे वाचविण्यासाठी सातत्याने लढा देणाऱ्या तरुण पर्यावरणवाद्यांनी साेशल मीडियावर जागृतीचा जाेर वाढविला आहे.
अजनी वनासाठी पर्यावरणवाद्यांचा लढा सुरू असताना शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांनी त्यात उडी घेतली. मुंबईतील आरे वन वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे सेनेच्या येथील कार्यकर्त्यांनाही दिशा मिळाली. सेनेच्या महिला नेत्या शिल्पा बाेडखे व युवा सेनेचे शशिकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात तरुण कार्यकर्त्यांनी सातत्याने आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हा विषय लावून धरला. वारंवार निवेदने दिली आणि याकडे लक्ष देण्याची विनंती केली. आरेचे यश आणि अजनी वन प्रकरण यामुळे वृक्ष संवर्धन कायद्यातील सुधारणांना दिशा मिळाली. हेरिटेज वृक्षांची संकल्पना, २०० च्यावर झाडे ताेडण्यासाठी केलेली मार्गदर्शक तत्वे व इतर निर्देश या सुधारणेत महत्त्वाची ठरली. राज्य मंत्रिमंडळाने सुधारणांना मंजुरीही दिली.
कायदा झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते थांबले नसून आदित्य ठाकरे यांच्याकडे अजनी वन वाचविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. नुकतीच त्यांची भेट घेऊन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केल्याचे शिल्पा बाेडखे यांनी सांगितले. यादरम्यान शिवसैनिकांनी नुकतेच महापालिकेसमाेर आंदाेलन करून झाडांवरील नाेटीस काढण्याची मागणी करीत आंदाेलनाचा इशारा दिला. दुसरीकडे कायद्यातील सुधारणांना मंजुरी मिळाल्याने पर्यावरणवाद्यांना आशा निर्माण झाली आहे. साेशल मीडियावर जनजागृती सुरू केली आहे. मागील आठवड्यात ‘सेव्ह अजनीवन’ चा ट्रेंड ट्विटरवर टाॅपवर चालला हाेता. लाेकांमध्ये झाडे ताेडण्यावरून राेष निर्माण हाेत आहे. आयएमएस प्रकल्पाला विराेध नाही पण हजाराे झाडे ताेडण्याऐवजी पर्याय शाेधला जावा, अशी नागरिकांची भावना असल्याचे साेशल मीडियावरील कमेंटवरून दिसून येत आहे.
आरटीईच्या माहितीतही संभ्रम
दरम्यान अजनीवन, अंबाझरी उद्यान व इतर परिसरात झालेल्या वृक्षताेडीबाबत आरटीईद्वारे माहिती मागण्यात आली. मनपाने दिलेली माहिती संभ्रम निर्माण करणारी असल्याचे शिल्पा बाेडखे यांनी सांगितले. कंत्राटदार मनपाकडून परवानगी घेऊनच झाडे ताेडल्याचे सांगतात तर मनपा कुणालाही झाडे ताेडण्याची परवानगी दिलेली नाही, असे सांगते. जर परवानगी दिली नाही तर उद्यान विभागाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न बाेडखे यांनी उपस्थित केला. भाेंगळ कारभार सुरू असल्याचा आराेप त्यांनी केला.