नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. येथील पुरातन वृक्षांनाच महत्त्व नाही तर त्या काळच्या आर्किटेक्चरनुसार तयार झालेले क्वाॅर्टर्स व इतर बांधकामालाही पुरातत्वाचे महत्त्व आहे. १८८० च्या दशकात जेव्हा पहिली कोळशावर चालणारी (स्टीम इंजिन) रेल्वे धावल्यानंतर ही वसाहत विकसित व्हायला सुरुवात झाली.
भारतात १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावली. इंग्रजांनी दळणवळणासाठी ती सुरू केली होती. पुढे १८६७ मध्ये मुंबई ते नागपूर गाडी सुरू करण्यात आली. नागपूर मध्यभागी असल्याने शहराचे महत्त्व इंग्रजांनी ओळखले होते. रेल्वेच्या शब्दावलीत नागपूरला ‘डायमंड क्रॉसिंग’ असे संबोधले गेले आहे. १८८१ मध्ये नागपूरहून राजनांदगाव गाडी सुरू करण्यात आली व पुढे तिला कोलकातापर्यंत वाढविण्यात आले आणि नागपूर-बंगाल असे नाव देण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने अजनी रेल्वे स्टेशनच्या विकासाला सुरुवात झाली. स्टेशन तयार झाल्यानंतर स्टीम इंजिनचे लाेकाेशेड आणि इंजिनिअरिंग वर्कशाॅप निर्माण करण्यात आले. यानंतर डिझेल इंजिनचे व आधुनिक काळात इलेक्ट्रीक इंजिनिअर्स वर्कशाॅप तयार करण्यात आले.माेक्याची जागा लक्षात घेत इंग्रजांनी गर्द वनराईत ही वसाहत तयार केली.
सखाचे प्रधान आर्किटेक्ट व पुरातत्त्व अभ्यासक संदीप पथे यांच्या टीमने या अजनीतील वसाहतीचे विश्लेषण केले. येथील क्वाॅर्टर इंग्रज अधिकाऱ्यांच्या रॅंकनुसार तयार करण्यात आले हाेते. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्या क्वाॅर्टर्सचे गेट आणि फेन्सिंगही वेगळ्या पद्धतीचे आहे. वेगळ्या प्रकारच्या दगडांचा उपयाेग करून तयार झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरमध्ये ब्रिटिश आर्किटेक्टची झलक बघायला मिळते. आतमध्ये असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्राचे बांधकामही याची साक्ष पटवते. हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय
ग्रीन व्हीजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी एनएचएआयद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे आणि शहराबाहेर त्याचा विचार शक्य नाही. मात्र एनएचएआयने या प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. परिसरात किती व काेणत्या प्रजातीचे वृक्ष आहेत व त्यांचे महत्त्व किती याबाबत सर्वेक्षण हाेणे गरजेचे आहे. यासाठी एनएचएआयने महापालिकेची मदत घ्यायला हवी. यानंतर माॅडेल स्टेशनमुळे किती इंधन वाचेल व त्यामुळे किती काॅर्बन रोखणे शक्य हाेइल, याची आकडेवारी सादर करावी. पुढे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, मनपा तसेच एनजीओ यांची चिंतन बैठक घेऊन विश्लेषण करावे. काॅलनी, शाळा व रुग्णालय कुठे शिफ्ट करणार व त्यासाठी किती वृक्षताेड करणार, याचीही माहिती सादर करावी, असे आवाहन चटर्जी यांनी केले.